हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अस्पृश्यता निवारण, स्त्री – पुरुष समानता, अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रयत्न केले. त्या उत्तम प्रशासक, आदर्श समाजकारणी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन विधान परिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर २९८ वी जयंती महोत्सव ३ दिवसीय समारंभास सुरुवात झाली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील चौंडी, ता. जामखेड या छोट्याशा गावी जन्मलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी – खंडेराव होळकर – यांच्याशी विवाह झाला.
खंडेरावांच्या मृत्यू पश्चात होळकर घराण्याच्या राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कौशल्याने स्वीकारली आणि जबाबदारीने उत्तम प्रकारे पार पडली. एवढ्यावरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत तर होळकर संस्थानचा किंबहुना त्या घराण्याच्यावतीने राज्यकारभार करताना राज्यातील लोकांच्या समस्या जाणून घेत, त्या तत्काळ सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले.