कराड | गेल्या दीड वर्षापासून रंगभूमी बंद आहे. त्यामुळे कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकार 1 सप्टेंबर रोजी निर्णय घेणार होते. मात्र निर्णय झालेला नाही. त्यामुळे रंगदेवतेला आपले साकडे मांडण्यासाठी रंगकर्मींनी कराड येथील यशवंतराव चव्हाण (टाॅऊन हाॅल) नाट्यगृहात आंदोलन केले.
यावेळी जेष्ठ कलाकार जुगल किशोर ओझा, प्रशांत कुलकर्णी, वासू पाटील, नितिन बनसोडे, ओंकार आपटे, प्रमोद गरगटे, प्रदीप हर्शे, सुनिल परदेशी शहरातील नाट्य संस्था, भजन, कीर्तन व रंगभूमीवरील कलाकार उपस्थित होते. कलाकारांनी रंगदेवतेची मूर्तीला अभिवादन करून आरती केली. तसेच रंगदेवतेला ग्राऱ्हाणे मांडले. गेल्या दीड वर्षापासून कलाकारांची परवड सुरू असून उपासमारीची वेळ आल्याचे ग्राहाणे मांडले आहे.
कलाकार वासू पाटील म्हणाले, नाट्य गृह उघडले आहेत, परंतु नाटकाचे प्रयोग होत नाहीत. आज दीड वर्ष झाले कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आहे. शासनाला कोणताही अर्ज न देता नटराजाला विनवणी करत आहोत. कलाकार कलेसाठी भुकेलेला आहे. सरकारने कला बंद पडल्यानंतर काही करण्यापेक्षा आता चालू करण्यासाठी परवानगी द्यावी. तुमच्या मदतीपेक्षा आम्हांला कला सुरू होणे महत्वाचे आहे.