राज्याला दोन मुख्यमंत्री देण्याचा टिळक हायस्कूलचा दुर्मिळ इतिहास : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळ कराड या संस्थेची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नाही. तर भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला आहे. ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ व पहिलीच घटना आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

कराड येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभास सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, अध्यक्ष डाॅ. अनिल हुद्देदार, सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, संचालक उदय थोरात, कौन्सिल सदस्य, अॅड. विक्रम कुलकर्णी, अॅड. सदानंद चिंगळे, सुधीर घाटे, डाॅ. मीना पेंढारकर, इंद्रजित चव्हाण, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. जी अहिरे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, शंभर वर्षाची शैक्षणिक परंपरा अखंडित राखणे एवढी सोपी बाब नाही. मात्र शिक्षण मंडळाने ती जोपासली आहे. त्याबद्दल शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे मी अभिनंदन करतो. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील भरभराट पाहून आनंद वाटतो. शिक्षण संस्था आदर्श कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण मंडळ आहे. देशप्रेमाचे धडे देणारी व राष्ट्रीय शिक्षणाचा पाया असणा-या टिळक हायस्कूलमध्ये मी शिकलो याचा मला अभिमान वाटतो. एकाच संस्थेने व शाळेने दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणारी टिळक हायस्कूल एकमेव शाळा आहे. हा शिक्षण क्षेत्रातील इतिहास आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब , आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव, कोल्हटकर असे शेकडो विद्यार्थी देशाच्या उभारणीत संस्थेने व शाळेने दिले आहेत. संस्थेने सर्वच शाखांच्या माध्यमातून उच्च गुणवत्ता जोपासली आहे, म्हणून आज संस्थेचे महाराष्ट्रात आदराने नाव घेतले जाते. देशविदेशात असणा-या पंधरा हजार माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस एकत्र करण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी व शाळेच्या मदतीसाठी पुढे येवून सहकार्य करावे. बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. चंद्रशेखर देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी आभार मानले.