हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका-टिपणी होताना दिसत आहे. तर राजकीय नेते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांविषयी दावा, गौप्यस्फोट करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा आग्रह होता” असे सांगितले आहे.
उमेश पाटील म्हणाले की, “2019 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शरद पवार यांचाही नकार होता”
भाजपसोबत आमची जी डील झाली…
त्याचबरोबर, “2019 साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील, अशी भूमीका घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच ठरलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदेंच नावही चर्चेत होत. परंतु एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता. पुढे मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील असे ठरल्यामुळे भाजपसोबत आमची जी डील झाली होती ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.” असाही गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, “भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असेल तर त्यासाठी दुसरे नेतृत्व पक्षात नको म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही. 2004 साली शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतले नाही.” असा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे. आता उमेश पाटील यांनी केलेल्या या सर्व गौप्यस्फोटांमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.