रश्मीका मंदाना | तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 Happy Birthday Rashmikaa | विभावरी विजया नकाते

आज रश्मीकाचा वाढदिवस. तिच्याविषयी फोटो स्टेटस तर मी पण ठेवलंय. पण तिच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या नसत्या तर मलाही सुखाने झोप लागली नसती, म्हणून हा छोटा प्रयत्न..

“कर्नाटका क्रश ” या नावाने रश्मीका सम्पूर्ण देशामध्ये ओळखली जाते. तिच्या चाहत्यांनी तिचे कित्येक फोटो शेयर करत तिला तिच्या वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्यात. खूप कमी कालावधीमध्ये ही अभिनेत्री देशभरातील प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालीय. आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. ही Expression Queen अनेकांच्या ” काळजाचा ठोक” बनलीय. लगातार सुपरहिट चित्रपट देण्यासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. कन्नड, तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमधील फिल्म इंडस्ट्रीची ती सध्या एकमेव क्वीन आहे. या तिन्ही भाषा न समजणारेसुद्धा अनेकजण फक्त रश्मीकाच्या प्रेमाखातर तिच्या फिल्म्स आवर्जून पाहतात आणि तिच्या अदाकारीने सजलेली गाणी शेअर करताना दिसतात. तिचा एकही डायलॉग समजत नसला किंवा तिच्या गाण्यातला एकही शब्द कळत नसला तरी फक्त तिच्या expressions आणि अभिनयासाठी भारतातील चाहते तिचे चित्रपट पाहतात.

२०१२ मध्ये रश्मीकाने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. त्याच वर्षी तिने Clean & Clear Fresh Face Of India Title हा सन्मान पटकावला आणि ती लगेच Clean & Clear ची Brand Ambassador बनली. काही वर्षे मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यानंतर तिने २०१६ मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील आपल्या करिअरची सुरवात केली. ‘किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून रश्मीकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आज ही अभिनेत्री देशभरातील कित्येकांच्या मनावर राज्य करतेय. किरीक पार्टीनंतर २०१७ मध्ये ती ‘अंजनी पुत्र’ आणि ‘चमक’ या दोन व्यावसायिक चित्रपटांतून झळकली. हे दोन्ही चित्रपट चांगलेच यशस्वी झाले. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधल्या या धमाकेदार एन्ट्रीनंतर लगेचच २०१८ मध्ये तिने तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ‘चलो’ या रोमँटिक चित्रपटातून प्रवेश केला. २०१८ सालीच ‘रोमकॉम’ आणि ‘गीथ गोविंदम’ या सुपरहिट फिल्म्स घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे हे चित्रपट तेलगू चित्रपटसृष्टीत सर्वाधिक नफा कमावणारे चित्रपट बनले. रश्मीकाने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. एवढ्यावरच न थांबता पुन्हा तिने अनेक दिग्गज कलाकार असलेल्या एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आणि तो चित्रपटही कमालीचा यशस्वी झाला. या चित्रपटाचं नाव होतं ‘देवदास’. कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीत अल्पावधीतच हिट सिनेमे देणाऱ्या रश्मीकाला लोकांच्या गळ्यातील ताईत बनायला वेळ लागला नाही.

या विक्रमाची मानकरी ठरल्यानंतरसुद्धा शांत राहील ती रश्मीका कसली? २०१९ मध्ये ‘यजमान’, आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांनी तिचा प्रेक्षकवर्ग पूर्ण भारतभरात पोहचवला. आता एकवेळ भारतीयांना बॉलिवूडमधल्या अभिनेत्री लक्षात राहणार नाहीत पण रश्मीका नावाचं वादळ येत्या अनेक वर्षं त्यांच्या मनावर घोंघावतच राहील.

२०२० साल नुकतंच सुरु झालं आणि भीष्म, सुलतान या चित्रपटांतून ती लोकांच्या भेटीला आली. चेहऱ्यावरचे निरागस हावभाव घेऊन रश्मीका आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

२०१७ मध्ये ‘बेंगलोर टाईम्स’ने रिलीज केलेल्या ‘३० महत्वकांक्षी महिलांच्या’ यादीत रश्मीका हे नाव अव्वल होतं. तेलगू चित्रपटसृष्टीत १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांचा भाग बनण्याची संधी अगदीच मोजक्या अभिनेत्रींना मिळाली आहे आणि रश्मीका त्यातीलच एक आहे. तामिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी रश्मीका आजही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अधिक तळमळीने प्रयत्न करत आहे.

रश्मीका तिच्या ड्रेसिंग स्टाईल, smile आणि attitude साठीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर रश्मीकाच्या चाहत्यांचा कहर झालेला आज पहायला मिळतोय. इन्स्टाग्रामवरून ती अनेकदा फोटो शेयर करत असते. कोणताही लूक अगदी सहजतेने स्वतःवर सूट करण्याचं तिचं कौशल्य नावाजण्यासारखं आहे. साडीमध्ये तर ती अधिकच सुंदर दिसते. तिचं सौंदर्य आणि तिची अदाकारी अनेकांच्या नजरा खिळवून ठेवते. इतर अभिनेत्रींच्या तुलनेने अगदी कमी मेकअप, उत्तम ड्रेसिंग सेन्स, उत्साही चेहरा, डोळ्यांची अदाकारी, चालण्यायातला आणि वागण्यातला साजेसा swag, तिचा आपल्याकडे सगळयांना आकर्षून घेणारा मुखडा, तिचा attitude आणि तिची स्टाईल अशा सगळ्याच वैशिष्ट्यांमुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी expression queen बनलीय. मुलं आज व्हाट्सअप्प स्टेटस ठेवत असताना अनेक मुली आपसूकच तिच्या नावाने बोटे मोडू लागल्यात. कर्नाटका क्रश आता खरोखरच भारतीय क्रशसुद्धा बनली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या आयुष्यातील ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. संचारबंदीच्या काळात ५ एप्रिलची रात्र ही मोदींनी सांगितलेल्या दिवेलागणीसाठी लक्षात राहिली तरी दिवस मात्र रश्मीकावरील प्रेम व्यक्त करण्यासाठीच आठवला जाईल एवढं मात्र खरं..!!

रश्मीकाविषयी थोडक्यात – रश्मीकाने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्य या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सुमन आणि मदन मंदाना यांची कन्या असलेली रश्मीका आज २४ वर्षांची झाली आहे. शाहरुख खान आणि रणवीर सिंगची चाहती असलेल्या रश्मीकाला श्रीदेवी, इमा वॉटसनही मनापासून आवडतात. डोसा हा तिचा आवडता पदार्थ असून तिला प्रवास करायला आणि पोहायलाही आवडतं.

विभावरी या मानसशास्त्र विषयाच्या पदवीधर असून त्यांना चित्रपट आणि पुस्तक परिक्षणाचीही विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8408877063

 

Leave a Comment