रेशनिंगचा काळाबाजार करणार्‍या वहागावच्या दुकानदाराचा परवाना अखेर रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेशनिंगच्या काळाबाजारावरुन चर्चेत असणाऱ्या वहागाव (ता. कराड) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा स्वस्त धान्य दुकान परवाना अखेर कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते  यांनी याबाबतचा आदेश कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना पाठविला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या या  कारवाईचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे हा धान्य वितरणानंतर शासन नियमानुसार ग्राहकांना कसलीही पावती देत नव्हता, दुकान आवारात कसलेही साठा दर्शक फलक लावले नव्हते, ग्राहक यादी लावली नव्हती, दुकानदाराने त्याच्याकडील पावती पुस्तक शासनाकडे सादर केले नव्हते, तसेच साठा बुकमध्ये व विक्री रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचे तसेच त्याठिकाणी प्रशासनाची कसलीही सही नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले होते, तसेच दुकानाची वेळ व सुट्टीचा दिवस याबाबत कसलीही माहिती ग्रामस्थांना देण्यात येत नव्हती, ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत ठराव बहुमताने मंजूर केला होता, प्रशासनाने केलेल्या तपासणीतही ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते, तपासणीवेळी शासनाचा मंजूर धान्य कोठा असतानाही दुकानदाराकडे तो प्रशासनाला कमी आढळून आला व काळ्याबाजाराने धान्याची विक्री करीत असल्याची माहिती समोर आली होती. तसेच सदर दुकानदार हा ग्रामस्थांना मंजूर धान्य कोठा मिळूनही व शासन नियमाने कमी दराने धान्य मिळत असतानाही ग्रामस्थांना कमी धान्य देऊन त्यांच्याकडून ज्यादा पैसे घेत असल्याची वस्तुस्थितीची माहिती गावातील सर्व्हेदरम्यान पुढे आली.

तसेच कोरोना आजाराच्या जागतिक महामारीच्या संकटकाळातही दुकानदार या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ठराविक लोकांना हाताशी धरुन ग्राहकांना शासन नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता व त्याची कसलीही पावती न देता धान्य कमी देऊन ज्यादा पैसे घेत असल्याचे आढळून आले होते तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीत वस्तुस्थिती असल्याची माहिती पुढे आल्याने जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे याचा रेशनिंग काळाबाजारप्रकरणी रास्त भाव दुकान परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करुन सदर दुकान परवाना रद्द केला असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे हा रेशनिंगमध्ये काळाबाजार  करीत असल्याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्यासह संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात होती. दरम्यान गावातील दक्ष ग्रामस्थ व युवकांनी रेशनिंगचा काळाबाजार व त्याला पाठिशी घालणाऱ्यांचे गार्‍हाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते यांच्यासमोर मांडले असता त्यांनी त्याची तात्काळ दखल घेत प्रशासनाला कारवाईच्या सूचना केल्या. आणि त्यानुसार संबंधित दुकानदारावर कारवाई झाल्याने व ग्रामस्थांना न्याय मिळवून देणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे ग्रामस्थ आभार मानत आहेत.