हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे… म्हणूनच की काय कोकणातील लोकसभेला दोन्ही जागा महायुतीनं जिंकल्या असल्या तरी रत्नागिरीच्या पाचीच्या पाची विधानसभा मतदारसंघातून हे ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळालेलं आहे… त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील विद्यमान आमदारांची धाकधूक चांगली वाढली असावी… अगदी तोंडावर आलेल्या या विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदासंघातील अटीतटीच्या लढती नेमक्या कुठल्या आहेत? नेमक्या कुठल्या शिवसेनेच्या बाजूने रत्नागिरीकर विधानसभेचा कौल देतायत? जिल्हयातील कोणत्या दिग्गजांची आमदारकी सध्या रेड झोन मध्ये आहे? त्याचाच हा आढावा…
पहिला मतदारसंघ येतो तो लांजा-राजापूर-साखरपा… दगडाला शेंदूर फासून त्याला मतदान करा म्हणून शिवसेनेने आवाहन केल्यास त्याला देखील मतं मिळतील आणि विजय मिळेल, असा शिवसेनेसाठी सेफ, हक्काचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांपैकी एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे लांजा-राजापूर-साखरपा…या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आमदार आहेत… ठाकरेंसोबत असणाऱ्या साळवेंनी(with) सलग तीन टर्म या मतदारसंघातून बाजी मारत राजापूरवर कायम भगवा फडकवत ठेवलाय… शिंदे गटात फूट पडूनही लोकसभेला या मतदारसंघाने ठाकरेंच्या उमेदवाराला तब्बल 21 हजारांचं लीड दिलं होतं… हा आकडा स्पष्ट सांगतोय की येणाऱ्या विधानसभेला ठाकरेंचे साळवी राजापूर मतदारसंघातून आरांत विजयाचा चौकार मारतायत… स्थानिक रिफायनरीवरील भूमिका, कुणबी समाजाची मतं या मतदारसंघात यंदा निर्णायक ठरणार आहे… बाकी शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची भाषा बोलून दाखवल्यामुळे इथून लढत अटीतटीची होईल.. बाकी काँग्रेसने केलेला दावा खोडून काढता आला तर राजन साळवी यांची आमदारकी सध्या तरी सेफ झोन मध्ये दिसतेय….
दुसरा मतदारसंघ रत्नागिरी विधानसभा…राजकारणातलं अचूक टाइमिंग साधायला ज्यांना जमलं ते शिवसेनेच्या उदय सामंत यांचा हा मतदारसंघ… कोकणात शिवसेना वाढण्यात ज्यांचा काही हातभार राहिला त्यात सामंत यांचेही नाव येतं… पण त्यांची राजकारणातील एंट्री मुळात राष्ट्रवादीतून झाली होती…(uday samant) 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते दोन टर्म आमदार राहिले… पुढे 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं… आणि इथून त्यांच्या राजकारणाने ग्रिप पकडली.. युती, महाविकास आघाडी, महायुती या सगळ्या सत्ता बदलाच्या काळात ते कॅबिनेट मंत्री पदावर राहिले… याच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला… फ्रंटला जरी उदय सामंत दिसत असले तरी त्यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अन्ना सामंत यांच्या तगड्या जनसंपर्काच्या जोरावर सामंत बंधू संपूर्ण कोकणावर काही प्रमाणावर होल्ड ठेवून आहेत… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदारसंघातून दहा हजारांचं लीड भेटल्याने सामंत यांची आमदारकी धोक्यात आलीये… असं म्हणता आलं तरी सामंत बंधूंनीच लोकसभेला ठाकरेंना मदत केली असल्याची चर्चा मतदार संघात होत असते… तरीही गद्दार विरुद्ध खुद्दार या लाईनवर होणाऱ्या रत्नागिरीच्या निवडणुकीत सामंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उदय बने, प्रदिप उर्फ बंड्या साळवी,राजेंद्र महाडिक यांची देखील नावं उमेदवारीसाठी समोर येतायत… असं असलं तरी सामंत यांचं पारडं सध्यातरी मतदारसंघात जड दिसतय…
तिसरा मतदारसंघ पाहूया तो दापोलीचा…रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. अर्थात दोघेही पितापुत्र सध्या शिंदे गटात असल्यानं दापोली विधानसभेचं स्थानिक गणितं बरीच बदलली आहेत. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांना या मतदारसंघानं 1990 पासून विधानसभेत पाठवलं… पण 2014 ला दळवींना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादीचे संजय कदम इथून निवडून आले… 2019 ला मात्र संजय कदम यांचं आव्हान मोडीत काढत शिवसेनेचं तरुण नेतृत्व रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना आमदारकीचा गुलाल लागला… सध्या तरी योगेश कदम यांना कुणी सक्षम विरोधक आहे असं म्हणता येणार नाही. योगेश कदम यांनी निधी देखील चांगला आणला आहे. गावच्या पायवाटेपासून ते नळपाणी योजनेपर्यंत त्यांनी कामं केली आहे. कदाचित इतक्या प्रमाणात आलेला निधी हा पहिलाच असावा….सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवबंधन हाती बांधल्यामुळे इथे दोन कदमांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळेल… त्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला दापोली मतदारसंघातून 8 हजाराचं लीड भेटल्याने यंदा कदम पितापुत्र यांच्या राजकारणावर टांगती तलवार आहे एवढं मात्र नक्की…
चौथा मतदारसंघ आहे तो गुहागरचा…शिवसेनेत बंडाळी केलेल्या नेत्यांना आपल्या भाषणातून झोडपून काढणाऱ्या ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांचा हा मतदारसंघ…रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव यांच्यात लढत झाली. त्यावेळी नातूसकट रामदास कदमांना या ठिकाणाहून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळेपासून भास्कर जाधव यांनी याच मतदार संघातून आपला दबदबा कायम ठेवला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अनेक मंत्रिपद याच मतदारसंघातील आमदारकीवर त्यांनी भूषवली. मात्र २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली…त्यातही शिवसेनेच्या फुटीनंतर तर भास्कर जाधव यांनी ठाकरे गटातील स्पेस भरून काढला…सध्या तरी गुहागरमधून भाजप तर्फे विनय नातू हे नाव समोर येत असलं तरी ते तितके सक्रीय दिसून येत नाही. त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि नाव ही त्यांची जमेची बाजू आहे. पण, सद्यस्थितीत त्यांचं म्हणावं तसं लक्ष गुहागरच्या विधानसभा मतदारसंघात नाही. भास्कर जाधव यांना आपल्या मुलाकरता देखील प्रयत्न करायचे आहेत… भास्कर जाधव यांची शिवसेनेतील नाराजी, स्थानिक पातळीवर राणेंशी घेतलेला पंगा आणि विकासाला मतदारसंघाला लागलेली खीळ पाहता या गोष्टी जाधवांना मायनस मध्ये घेऊन जातात… पण तरीही सध्यातरी भास्कर जाधव यांचं मतदारसंघातील पारडं जड दिसतंय…
पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो चिपळूणचा…जिल्ह्यात भगव्याचा झंझावात असताना केवळ चिपळूण हा मतदारसंघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. त्या ठिकाणी सध्या अजित पवार गटाचे शेखर निकम हे आमदार आहेत… शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या चिपळूण मध्ये शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत निकमांनी हा गड आपल्याकडे खेचून आणला…सध्याच्या घडीला शेखर निकम यांना आव्हान नाही. निकम यांनी आपला मतदारसंघ चांगला बांधला आहे. घराघरात त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यापेक्षा शेखर निकम ही व्यक्ती म्हणून देखील त्यांच्या पाठिशी लोकं आहेत….सध्या चिपळूणमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी आहे. अशा वेळी 2019 मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर देखील सदानंद चव्हाण सक्रिय दिसून आले नाहीत… संपर्क कार्यालायही नसल्यानं ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांचा स्थानिक नेत्यांशी संपर्क ही तुटलाय… थोडक्यात निकमांचा पराभव करणं महाविकास आघाडीला सध्यातरी अवघड दिसतंय…तर अशी होती रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य लढतीचा आढावा… बाकी लोकसभेला कोकणात मायनस मध्ये गेलेल्या ठाकरेंना विधानसभेला तरी यश येईल का? कोकणातील दिग्गज नेत्यांपैकी नेमकी कुणाची आमदारकी धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…