हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Ganpatipule) महाराष्ट्रातील अनेक मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासामुळे तर काही मंदिरे अध्यात्मिक वारसा आणि आख्यायिकांमुळे प्रसिद्ध आहेत. तर काही मंदिरे मात्र पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. जिथे कायम पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. असेच एक सुंदर मंदिर कोकणात आहे. जे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पर्यटन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘गणपतीपुळे मंदिर’. कदाचित तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल. पण आज आपण या मंदिराविषयी काही महत्वाच्या आणि आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत.
तीर्थक्षेत्र गणपतीपुळे (Ratnagiri Ganpatipule)
कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं नयनरम्य निसर्गचित्र. लाल माती, अथांग समुद्र किनारा, नारळाची झाडे आणि बरचं काही… मात्र रत्नागिरीविषयी बोलताना आवर्जून तीर्थक्षेत्र गणपतीपुळेबद्दल बोलले जाते. कोकणातील हे एक महत्वाचे आणि अत्यंत पुरातन असे तीर्थक्षेत्र आहे. सुमारे ४०० वर्ष जुने हे गणपतीपुळे मंदिर अत्यंत चमत्कारिक आहे. आज आपण या मंदिराविषयी बऱ्याच लोकांना माहित नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत.
इच्छापूर्ती गणेश
भारताच्या आठ दिशांमध्ये आठ द्वार देवता आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पा. गणपतीपुळ्याचा बाप्पा हा पश्चिमद्वार देवता असून इथे येणाऱ्या भक्तांची इच्छापूर्ती करतो, अशी मान्यता आहे. (Ratnagiri Ganpatipule) इथे पूर्ण श्रद्धेने येणाऱ्या भक्तांची इच्छा पूर्ण होते. या मंदिरात येणारा भक्त मूषकराजाच्या कानात जे काही सांगेल ती इच्छा श्री गणेश पूर्ण करतात, अशी इथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे.
काय आहे आख्यायिका?
रत्नागिरी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे हा बाप्पा इच्छापूर्ती आहेच. शिवाय गणपतीपुळे हे श्री गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. (Ratnagiri Ganpatipule) माहितीनुसार, सुमारे ५०० वर्षांपूर्वी बाळ भटजी भिडे यांना गणपती बाप्पाने साक्षात्कार दिला होता. त्यावेळी बाळ भटजी भिडे यांना बाप्पाच्या साकार रूपाचा दृष्टांत झाला. या दृष्टांतानंतर इथे गणपती बाप्पाची मूर्ती प्रकट झाली, अशी अख्यायिका आहे.
समुद्राच्या लाटा करतात चरणस्पर्श
गणपतीपुळे मंदिराची खासियत म्हणा किंवा वैशिट्य.. या मंदिराच्या आजूबाजूला नारळाची झाडे आणि समोर अथांग समुद्रकिनारा आहे. जो पर्यटकांना आकर्षित करतो. (Ratnagiri Ganpatipule) याच समुद्राच्या लाटा थेट मंदिराच्या आत श्री गणेश मूर्तीच्या पायाला स्पर्श करतात. पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या लाटा मंदिराच्या आत प्रवेश करून थेट गणपती बापाच्या पायाला स्पर्श करतात आणि त्यानंतर लाटांची तीव्रता कमी होते.
कसे जाल?
समुद्रापुढे पुळणीच्या (वाळूचे) भव्य भागात श्री गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला ‘गणपतीपुळे’ असे नाव पडले. जगभरात हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही रेल्वेने किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता. मुंबईपासून सुमारे ३३३.२ किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. इथे रत्नागिरी एसटी डेपोतून गणपतीपुळेसाठी थेट एसटी बस आहे. (Ratnagiri Ganpatipule) ही बस ४५ मिनिटांमध्ये मंदिराबाहेर सोडते.