… तर महिलांच्या खात्यावरील 1500 रुपये काढून घेणार; रवी राणांचे धक्कादायक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या रक्षाबंधनच्या खास निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण ३००० रुपये महिलांना मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यभरातील महिला वर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजेनेबाबत खळबळजनक विधान केलं आहे. आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर महिलांच्या खात्यावरील १५०० काढून घेणार अशी थेट धमकीच रवी राणा यांनी दिली आहे.

रवी राणा यांनी आज अमरावती मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. याचवेळी रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं रवी राणा यांनी म्हंटल. रवी राणा यांच्या या विधानाने महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे.

दरम्यान, येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हि योजना म्हणजे महायुती सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. राज्यभरातील महिलांना सुद्धा हे पैसे कधी एकदा जमा होतात याची आतुरता लागली आहे.