Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष!! विधानसभेच्या 25 जागा लढवणार

Ravikant Tupkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज मोठा निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं त्यांच्या पक्षाचे नाव आहे. रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची आणि आगामी धोरणांबाबत घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून मला वेगळं केलं हे ऐकून मला धक्का बसला. संघटनेसाठी मी अनेकदा जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. असं असतानाही राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली ते ऐकून मला धक्का बसला. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली अशी खंत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. आज आम्ही 4 तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि काही महत्वपूर्व निर्णय घेतले. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करत आहोत असं तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले.

25 जागांवर निवडणूक लढवेल- Ravikant Tupkar

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी २५ जागांवर निवडणूक लढवेल, यात बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदारसंघाचा समावेश आहे. लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहे तसेच राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. तुपकर यांनी नवीन पक्ष काढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडत रयत क्रांती संघटना स्थापन केली, आता रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना केल्याने राजू शेट्टींपुढे आणखी एक आव्हान उभं राहिले असं म्हणावं लागेल.