हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सोशल मीडियात पांढरा शर्ट अन पायजमा घालून उन्हातून पायी चालत निघालेल्या एका ८० वर्षांच्या आजोबांचा फोटो व्हायरल होत आहे. पत्रकार संपत मोरे यांनी फेसबुकवर सदरील फोटो पोस्ट केला असून त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणारी व्यक्ती रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम यांचे चिरंजीव असल्याचं समोर आलं आहे. गावातील शाळा सुधारली पाहिजे, शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत, पडझड झालेली इमारत दुरुस्त केली पाहिजे, वसतिगृहात मुलामुलींना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत या तळमळीने मुकादम तात्यांचे चिरंजीव विलासराव कदम उर्फ अण्णा वरचेवर साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात येत असतात. असेच कामानिमित्त आले असताना त्यांचा फोटो काढून संपत मोरे यांनी फेसबुकला पोस्ट केला आणि अण्णांची हि गोष्ट व्हायरल होत यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
संपत मोरे आपल्या पोस्ट ,मध्ये लिहितात, हा फोटोत दिसतो तो पांढरा शर्ट आणि विजार घातलेला माणूस आठवड्याला सत्तर किलोमीटर एस टी ने प्रवास करून येतो.सातारा सायन्स कॉलेज समोर उतरतो आणि तिथून असल्या उन्हा पावसात रयत शिक्षण संस्थेच्या ऑफीसमध्ये चालत जातो. हा माणूस आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचा मुलगा आहे. की ज्यांच्या वडिलांनी ७० वर्षापूर्वी करोडो रुपयांची पोती आणून कर्मवीर अण्णा यांच्या पायाशी आणून ओतली. त्या महान व्यक्तीचे नाव दानशूर बंडो गोपाळा मुकादम – कदम आणि फोटोत दिसते ती व्यक्ती विलासअण्णा कदम. ( वय ८०) आण्णा लिफ्ट घेत नाही. कोणत्याही दुचाकीवाल्याला लिफ्ट मागत नाहीत.पण आज त्यांना सातारा येथील रयत संस्था कार्यालयापर्यंत सातारा जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांनी लिफ्ट दिली.
नाहीतर अशी थोर लोक चालतच आहेत, चालत राहतील..
रयत शिक्षण संस्था म्हटले कि समोर उभा राहतो कर्मवीर भाऊराव पाटील अन त्यांनी रयत उभी करण्यासाठी केलेला संघर्ष. कर्मवीर अण्णांनी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत या उद्देशाने पेटून उठून परिश्रम केले. या कार्यात त्यांना अनेकांची मोलाची साथ लाभली. त्यातीलच एक नाव म्हणजे दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या. मुळच्या सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या कुसूर गावच्या तात्यांनी संत गाडगेबाबा यांना आपले गुरु मानून स्वतःला रयत शिक्षण संस्थेच्या कामात वाहून घेतले होते. कराड शहरातील सदगुरु गाडगे महाराज कॉलेज (SGM), वाठार, कुसूर, ढेबेवाडी, सणबुरसह अनेक ठिकाणी शाळा अन महाविद्यालय उभी केली. ब्राह्मणाच्या शेंडीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं मी शिकवेन असं विधान कर्मवीर अण्णांनी केल्यांनतर सरकारने रयतेची ग्रॅण्ट बंद केली होती तेव्हा मुकादम तात्यांनी १०० एकर जमीन संस्थेला दान केली. कर्मवीर अण्णांनी शेतकऱ्याचा पोरगा संस्थेचा अध्यक्ष व्हावा म्हणून मुकादम तात्यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केले. आपल्याकंडील शेकडो एकर जमीन दान करून बहुजनांची पोरं शिकवीत म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिलेल्या मुकादम तात्यांचे चिरंजीवही तितक्याच तळमळीने शाळेसाठी झटत आहेत. या पोस्टनंतर अनेकजण सोशल मीडियात तात्यांचे चिरंजीव असलेल्या विलासराव कदम अण्णांचे कौतुक करत त्यांना रयतेच्या गव्हर्निंग बॉडीत घ्यावे अशी मागणी करत आहेत.