हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. RBI ही भारतीय रुपयांच्या जारी, पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. मुख्य म्हणजे RBI ही देशभरातील प्रमुख पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करते.
या अधिरांतर्गत नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसंदर्भात कठोर निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अगदी पैसे काढण्यापासून ते गुंतवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत RBI ची परवानगी गरजेची राहणार आहे. अशावेळी RBI ने काय पर्याय उपलब्ध करून दिले आहेत याविषयी माहिती घेऊया.
RBI ने कोणत्या बँकेवर निर्बंध लावले आहेत?
भारतीय रिझर्व बँक (RBI) ने राज्यातील शिरपूर मर्चंट्स को- ऑपरेटीव्ह बँकेसंदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातून पुढील ६ महिने पैसे काढता येणार नाहीत. तसेच बँकेला कर्ज देण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच या बँकेच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी किंवा बचत खात्यातील रक्कम आता काढता येणार नाही. यामुळे शिरपूर मर्चंट्स बँकेच्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या खराब आर्थिक परिस्थितीमुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
६ महिने निर्बंध राहणार
एका वृत्तानुसार, RBI ने याआधी देखील काही बँकांवर इतके कठोर निर्बंध लावले आहेत. येस बँक आणि पीएससी बँकेने याचा अनुभव घेतला आहे. यानंतर आता शिरपूर मर्चंट्स को- ऑपरेटिव्ह बँकेवर RBI ने कठोर निर्बंध लावले आहेत. ज्यात या बँकेतून पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या बँकेच्या ग्राहकांना पुढील ६ महिने तरी बँकेतील खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.
गुंतवणूकदारांचं काय?
RBI ने शिरपूर मर्चंट्स को- ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्याने बँकेचे ग्राहक आणि गुंतवणूकदार चांगलेच अडकले आहेत. यावेळी RBI ने म्हटले की, ‘परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम, नूतनीकरण करता येणार नाही. तसेच कोणालाही बँकेत गुंतवणूक करता येणार नाही’. यामुळे आता शिरपूर मर्चेंट्स को- ऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘अशी’ मिटणार चिंता
डिपॉजिट इंश्योरन्स आणि क्रेडिट गॅरंटी निगमच्या (DICGC) अधिनियमानुसार, RBI ने कोणत्याही बँकेवर निर्बंध आणले असता बँकेच्या ग्राहकांना ५ लाखांपर्यंतची रक्कम प्रदान केली जाऊ शकते. कारण बँकेच्या प्रत्येक गुंतवणूकदाराचा विमा असतो. या अंतर्गत ग्राहकाच्या खात्यातील मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून पैसे दिले जातात. ग्राहकांचा हा विमा सर्व प्रकारच्या रक्कमेवर लागू असतो आणि ही रक्कम निर्बंध लागल्यानंतर ९० दिवसाआत मिळते. याबाबतची अधिक माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली असते.