कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून कोरोना चाचण्या वाढवा – प्रशासक आस्तिककुमार पांडेय

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून ही लाट संपुष्टात यावी यासाठी उपाय योजना करणे सुरु आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लवकरात लवकर कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या अशा सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनासाठीच्या लस उपलब्ध होताच नागरिकांना द्याव्यात आणि लसीचा साठा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. असे आदेश प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचीही काळजी घ्यावी. असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील कोविड चाचण्या, पॉझिटिव्हीटी दर, खाटांचे व्यवस्थापन, ऑक्सीजन साठा, कोविड लसीकरणाबाबत ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाय योजनेबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करत काळजी घेण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

You might also like