नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,
महाजन बंधूंच्या शिरपेचात आणखी एका विक्रमाचा तुरा महाजन बंधू फाउंडेशनतर्फे आयोजित के २ के (श्रीनगर ते कन्याकुमारी) या विशेष मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. भारताच्या उत्तरेतून दक्षिणेकडे सर्वात वेगवान सायकल प्रवास या प्रकारात या मोहिमेची नोंद झाली आहे.
गिनीज आणि डब्ल्यूयुसीए यांनी या मोहिमेसाठी १२ दिवसांची वेळ निर्धारित केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये श्रीनगरपासून काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ८५० किलोमीटर अंतर महाजन बंधूंनी १० दिवस १० तासांत पूर्ण करीत विक्रम केला होता. गिनीज बुकने बुधवारी (दि. २४) उशिरा या विक्रमाची नोंद घेतली. या मोहिमेत आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लाल चौक, श्रीनगर येथून ५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७.४४ वाजता के २ के मोहीम सुरू झाली आणि १५ नोव्हेंबरला ५.४५ वाजता केप कोमोरिन, कन्याकुमारी बीच या ठिकाणी समाप्त झाली. तंबाखुमुक्ती आणि खेलो इंडिया या योजनांना समर्थन देण्यासाठी ही मोहीम समर्पित करण्यात आली. यात एकूण १० हजार हॅन्डबिल मुद्रित करून लोकांना वितरित करण्यात आले. युवकांना तंबाखू सोडण्याचे आवाहन करीत व्यायाम आणि खेळाची सांगड घालावी, असे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेत सहकार्य करणाऱ्यांचे दोघांनी आभार मानले.