औरंगाबाद – शहरातील किमान तापमानात काल एकाच दिवसात 5.2 अंश सेल्सिअसने घट झाली आणि या वर्षीच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चिकलठाणा वेधशाळेत 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कडाक्याच्या थंडीने शहर गारठले आहे.
शहरात रविवारी 15.4 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. त्यात मोठी घसरण झाली आणि हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला शहरवासियांना सामोरे जावे लागले. गार वाऱ्यामुळे दुपारच्यावेळीही बोचरी थंडी जाणवत होती. त्यामुळे दुपारी उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक दिसून आले. शहरात थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे ही अवघड होत आहे.
वाढत्या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. आगामी दिवसात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा ही किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.