हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती (Teachers Recruitment) प्रक्रियेचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याची जबाबदारी तलिस्मा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडला दिली आहे. जानेवारी अखेर या पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड केल्या जाणार आहेत. तर जून अखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल. अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. (Job News)
महत्वाचे म्हणजे, राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या वर्गांसाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती पूर्ण झाली असून जानेवारी अखेर छपाई प्रक्रिया सुरु होणार आहे. मराठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम राबविण्यासाठीही नियोजन पूर्ण झाले आहे.
भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबवण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार, येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. या प्रक्रियेद्वारे शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नियुक्त करून गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाईल.
किती पदांसाठी भरती
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील भरतीनंतरही अनेक पदे रिक्त राहिल्याने शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी ही पदे भरण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. शासनाने ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यास मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अंदाजे १५००० पदे भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या जागा लवकरच भरण्यात येणार आहेत.