गावातील तिघांना कर्ज देण्यास टाळाटाळ.
गोंदिया प्रतिनिधी
शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांने याची तक्रार जिल्हाधिकारी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडे केलीे आहे.
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील तिगाव येथील रहिवासी अरुण पोंगळे यांनी वर्षभरापूर्वी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शेळी पालन व्यवसायाकरिता कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. तेव्हा बँक व्यवस्थापनाने पोंगळे यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास व यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेवून व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र यानंतरही बँकेने त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याच गावातील तीन लाभार्थ्यांना मागील वर्षभरापासून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
मागील वर्षभरापासून कर्ज न मिळाल्याने पोंगळे यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. एकीकडे शासन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा लोण योजना राबवित आहे.
तर दुसरीकडे कर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन सुध्दा कर्ज देण्यास बँकाडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाही करण्याची मागणी अरुण पोंगळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यव्यवस्थापक, ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे