काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शकत नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भेट घेतली. ममता बॅनर्जींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाबाबत अनेक चर्चा केल्या जाऊ लागल्या. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले. “राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणे गैर नाही. पण बेकीचे वातावरण करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये. आणि काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असे चव्हाण यांनी म्हंटले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना काही राजकीय महत्त्वकांक्षा असतील तर त्यातही काही गैर नाही. परंतु मोदींनी पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्या एकजुटीत त्यांनी कुठेतरी बेकीच वातावरण निर्माण करु नये. ती एकजूट तोडण्याचा प्रयत्न करु नये.

काँग्रेसशिवाय कोणत्याही प्रकारची महाआघाडी होऊच शकत नाही. जर झाली तर ती यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असण गैर नाही. ज्यांना पंतप्रधान व्हायचे असेल त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकाव्यात. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. पण स्वतःच्या महत्वकांक्षा पुढे आल्यातर काही निष्पन्न होणार नाही, असेही चव्हाण याने यावेळी सांगितले.