औरंगाबाद । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात जिल्हावासीयांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या सोबतच रुग्णालयातच मुक्काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हे नातेवाईक बाहेर मुक्तसंचार देखील करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर मुक्तसंचार करत असल्याने कोरोनाच धोका आणखीच वाढत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डातील रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. प्रत्येक रुग्णाच्या सोबत त्याचा एकतरी नातेवाईक चक्क रुग्णाच्या शेजारीच असल्याचे चित्र बघयला मिळत आहे. हे नातेवाईक केवळ मास्क घालून तिथे उपस्थित असतात त्यांना पीपीई कीट नसतो. हे नातेवाईक तिथेच तासनतास तिथेच असल्याने हे सुपर स्प्रेडर बनत आहेत. शहरातील एका दैनिकाने या संबंधीचे वृत्त प्रकाशित केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
म्हणून नातेवाईक जातात कोरोना वार्ड मध्ये.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना झालेला व्यक्ती रुग्णालयातून परत येईलच याची काहीच शाश्वती नसल्याने औरंगाबादकर भयभीत झाले आहेत. त्यामुळेच डॉक्टर आपल्या रुग्णावर नीट उपचार करणार नाहीत, या भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयात थांबत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, दुसरीकडे नातेवाईकांच्या या अनाठायी हट्टामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.