खळबळजनक! पंढरपूरमध्ये मठाच्या वादावरून धर्मगुरूंना लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

0
4
Pandharpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरण चर्चेत असतानाच, पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील मंगळवेढा येथे आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धनकेरी गावातील तोफकट्टी संस्थान मठाचे प्रमुख धर्मगुरू राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी (Rachoteshwar Shivacharya Swamiji) यांना काही स्थानिक गुंडांनी रात्री मठातच घुसून लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव पसरला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

राचोटेश्वर स्वामी हे गेल्या 36 वर्षांपासून तोफकट्टी संस्थान मठात मठपती म्हणून सेवा बजावत आहेत. गावात मठाच्या मालकीवरून आधीपासूनच वाद सुरू होता. यापूर्वी गावातील काही जणांनी त्यांच्यावर मठावर हक्क सांगत स्वामिजींना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. 3 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्वामीजी झोपण्यासाठी खोलीत जात असताना संशयितांनी मठातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि लाईट बंद केली. त्यानंतर “मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे, तू बाहेरून आलेला आहेस, तुला येथे राहण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत स्वामीजींना खोलीबाहेर खेचून आणले. त्यांना लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले.

स्वामीजींनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला की, “आपले प्रकरण सध्या न्यायालयात आहे, तुम्ही असे वागू नका,” मात्र आरोपींनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना बेदम मारले. हल्ल्यात त्यांचे पाठीवर, उजव्या खांद्यावर आणि दोन्ही मांड्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर स्वामीजींनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राजू लिंगाप्पा कोरे, मंजूनाथ सकलेश कोरे, भीमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे आणि सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धार्मिक स्थळी अशा प्रकारचा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.