रेमडिसिवीरचा काळाबाजार ः दोन तालुक्यातील आणखी तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | फलटण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना फलटण शहर पोलिसांनी रविवारी सापळा लावून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोमवारी पाटण तालुक्यातील तारळे येथील तिघांवर तसेच सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र रामचंद लाहोटी, अरुण जाधव (रा. तारळे), अमित विजय कुलकर्णी (रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यामुळे रेमडिसिवीरचा काळाबाजारचे कनेक्शन जिल्ह्यात आणखी कोठे- कोठे आहे, यांचा पोलिस तपास करत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वार्डबॉय सुनील कचरे हा रेमडेसिविर इंजेक्शनची छापील किमतीपेक्षा ज्यादा दराने इंजेक्शन विकत होता. कचरे एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सुनील कचरे व त्याच्याबरोबर असणारा अजय सुरेश फडतरे यांना अन्न व औषध निरीक्षक अरुण गोडसे यांच्या सहकार्याने पकडले होते. त्यांच्या चौकशीतून प्रवीण मिस्त्री ऊर्फ प्रवीण दिलीप साप्ते (रा. घाडगेवाडी, ता. फलटण) व निखिल घाडगे यांना अटक केली होती. या चौघांवर रविवारी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. चौघांकडे चौकशी केली असता, आणखी काही नावे उघडकीस आली. त्यामध्ये साताऱ्यातील अमित विजय कुलकर्णी (वय ४५) याने संबंधित रेमडेसिविर इंजेक्शन रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय ३२) याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. दोघांना पहाटे फलटण शहर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या चौकशीतून तारळे येथील मेडिकल चालक अजित जाधव व त्याच्या भावाचे नाव समोर आल्याने जाधव याला अटक केली आहे. त्याच्या भावाला अद्याप ताब्यात घेतलेले नाही.

फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला त्याच्या तिघा साथीदारांसह पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करताना अटक केली आहे. आता पोलिसांनी या रेमडिसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजात अजून कोणा- कोणाचा सहभाग आहे, हे तपासत आहेत.

रेमडिसिवीरचा काळाबाजार पाळुमुळे फलटणसह अन्य तीन तालुक्यात

रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार फलटण तालुक्यात उघडकीस आलेला आहे. तेथून काळाबाजार करणाऱ्यांना उचलल्यानंतर सातारा व पाटण तालुक्यातील काहींचा सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले आहे. मात्र त्याचबरोबर कराड तालुक्याचेही कनेक्शन जोडले गेले असून त्याबाबत गोपनियता ठेवून तपास चालू आहे.

Leave a Comment