शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील ती समाधी हटवा; संभाजीराजांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Sambhajiraje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर चांगलाच वाद उफाळलेला आहे. अशातच आता युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj Sambhajiraje Chhatrapati) यांनी एक वेगळाच विषय उपस्थित केला आहे. त्यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) समाधीजवळ असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ती समाधी त्वरित हटवावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांचे पत्र

आपल्या पत्रात संभाजी राजे यांनी म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

https://www.facebook.com/100044614891340/posts/pfbid099YF3uiP1JbEN5pWSyAMZoNffb2nshgR1vb3i96uHP5UjwQVGYMu2BszHhTaB7xZl/?app=fbl

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या या भूमिकेवर विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र काही इतिहासतज्ज्ञ आणि शिवप्रेमी संभाजीराजे यांच्या भूमिकेला समर्थन देत आहे. तरी काहींनी यावर आक्षेपही घेतला आहे. आता राज्य सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.