कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गत पाच वर्षात कोयना पर्यटन हे पाटण तालुक्याच्या सक्षम लोकप्रतिनिधींनी तथा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे नावाजलेले ठिकाण झाले आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या ठिकाणी अनाधिकृत असेलेल्या बोटींगला अधिकृत दर्जा मिळावा यासाठी सातत्याने 10 वर्षांपासून या तालुक्याचे लोकप्रतिनिधी संघर्ष करत आहेत. कोयनानगर येथील पर्यटनाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीच केले असल्यामुळे ना. शंभूराज देसाई यांनी मंजूर केलेल्या कोयना परिचय केंद्राची काळजी विकास कामांची काविळ झालेल्यांनी करु नये. राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणायचं आणि तालुक्यात मंजूर झालेल्या विकास कामांबाबत प्रसिध्दीपत्रकाव्दारे टिप्पण्णी करणाऱ्या काही रिकामटेकडया मंडळींनी प्रसिध्दीपत्रकांव्दारे केलेले आरोप बालिशपणाचे असल्याचे प्रतिउत्तर शिवसेनेचे माजी सरपंच शैलेंद्र शेलार, सरपंच सावळाराम लाड, सरपंच शंतनू भोमकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गृहराज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या शासकीय स्तरावर भेटेल त्या माध्यमातून कोयना पर्यटनासाठी कोट्यवधी निधी मंजूर केला जात आहे. कोयना पर्यटन आराखडयातून कोयनानगर येथील नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण, कोयना धरण परिसराकडे जाणा-या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण,शासकीय विश्रामगृह चेमरीचे नुतनीकरण, पर्यटकांकरीता बैठक व्यवस्था, लहान मुलांच्याकरीता वॉटर पार्क, आंबाखेळती देवी मंदिर बोपोली ढाणकल येथे परिसर सुशोभिकरण,ओझर्डे निसर्गरम्य तीन धारी धबधबा परिसर सुशोभिकरण या कामांकरीता निधी मंजूर करण्यात आला. नुकतेच आमचे नेते गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोयना विभागामध्ये पर्यटनाच्यादृष्टीने कोयना निसर्ग परिचय केंद्रासाठी 5 कोटींचा निधी नुकताच मंजूर केला आहे.
कोयना विभागातून या पर्यटनाचा फायदा केवळ आणि केवळ स्थानिक लोकांना व्हावा यासाठी ना. शंभूराज देसाई नेहमीच प्रयत्नशील आहेत. पर्यंटनासाठी मंजूर होणारा निधी आणि त्या अनुषंगाने त्यांच्या वाढती लोकप्रियता या संबंधीची कोयना विभागातील काही पदाधिकाऱ्यामधील मळमळ त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आरोपातून दिसून येत असल्याचे प्रसिध्दीपत्रकांत नमूद करत ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातूनच कोयना जलाशयामध्ये बोटींग सुरु होण्यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच गृहराज्यमंत्री म्हणून गृहविभागाच्या दृष्टीने महत्वाची असणारी कोयना धरणाची सुरक्षितता आणि पर्यटनाच्या दृष्टीने बोटींगचा फायदा स्थानिकांना व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बोटींगबाबत स्वत: काय प्रयत्न केले हा प्रश्न तर अनुत्तरीतच आहे.
तसेच कोयनानगर येथील शासकीय विश्रामगृहाची जुनी झालेली चेमरीची इमारत पाडून त्यांनी माध्यमातून बांधलेली अद्यावत चेमरीबद्दल देखील यांच्यात पोटशूळ का आहे हा संशोधनाचा विषय झाला आहे. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराची चिंता करणाऱ्यांना स्वत: किती प्रयत्न करून रोजगार निर्मिती केली याची माहिती घ्यावी. हुंबरळी एम. टी. डी. सी. च्या रस्त्यासाठी प्रेम दाखवणाऱ्यांना खरच पर्यटकांची काळजी आहे की कोणाची? हेही सांगीतले असते तर बरे झाले असते. किमान जनतेला तरी कळाले असते. अडचणीच्या संकटाच्या काळात घरात बसणाऱ्यांनी, आजपर्यंत सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी तसेच कामांची मक्तेदारी करणाऱ्यांनी जनतेचा फुकटचा कळवळा आणू नये. ना. शंभूराज देसाई यांचे माध्यमातून विकासाची कामे मंजूर करुन कसलेही राजकीय हेवे-दावे न करता कोयना विभागातील जनतेपर्यंत विकास कामे पोहचविण्याचे आम्ही काम करत असल्याने नेमकं कुणाच्या मागं जनता फरकटत आहे हे ही सर्वश्रुत आहे. केवळ राजकीय स्वार्थसाठी आमच्या नेतृत्वार आरोप करून आपल्या स्वतःच्या नेत्याची निष्क्रियता आणि नाकर्तेपणा झाकला जाणार नाही. आम्ही राजकीय मर्यादा पाळणारी माणसे आहोत, संबंधित विभागाची ठेकेदारी तुम्ही करायची आणि स्थानिकांना भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी आंदोलने करायला लावून तुम्ही तुमचे राजकीय स्वार्थ कसे साधले हे सांगायची वेळ येणार नाही याची चिंता करावी, असे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.