हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate । तुम्ही जर गृहकर्ज, कार लोन मुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिजर्व बँक या आठवड्यात पुन्हा एकदा व्याजदर कमी करू शकते असं बोललं जातंय. ६ जून रोजी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात ०.२५% कपात करू शकते. असं झाल्यास तुमच्या महिन्याच्या EMI चा बोजा काही प्रमाणात हलका होऊ शकतो.
किरकोळ महागाई गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी ४% च्या टार्गेट पेक्षा कमी राहिली आहे असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, रेपो रेट (Repo Rate) मध्ये पुन्हा ०.२५% कपात केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी, आरबीआयने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो रेट ०.५०% ने कमी केला होता, ज्यामुळे तो ६% पर्यंत खाली आला होता. आता येत्या ६ जूनला रेपो रेट पुन्हा एकदा कमी झाल्यास यावर्षी तिसऱ्यांदा रेपो रेट मध्ये कपात होईल. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक ४ जूनपासून सुरू होणार आहे तर शुक्रवार ६ जून रोजी रेपो रेट बाबत निर्णय जाहीर होईल. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती महागाई, वाढ आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन रेपो रेट कमी करायचा कि आहे तसाच कायम ठेवायचा याबाबत निर्णय घेईल.
रेपो रेट म्हणजे काय? Repo Rate
रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यावसायिक बँकांना अल्पकालीन निधी देण्यासाठी जो व्याजदर वापरते, तो दर. सोप्या भाषेत, बँका RBI कडून ज्या दराने पैसे घेतात, त्या दराला रेपो रेट (Repo Rate) म्हणतात. रेपो रेटचा उपयोग RBI अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी करते. जर रेपो रेट जास्त असेल तर कर्ज घेणे महागते आणि पैशांचा पुरवठा कमी होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते, पैशांचा पुरवठा वाढतो, आणि आर्थिक वाढीला चालना मिळते.