हॅलो महाराष्ट्र । गेल्या अनेक दिवसांपासून माध्यम आणि माध्यम प्रतिनिधि यांच्या एकंदरीत कामाविषयी आणि कामाच्या स्वरूपाविषयी अनेक बाबी चर्चिल्या जात आहेत. आता लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला आहे का? असे अनेक प्रश्न देखील विचारले जात आहेत.पण भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात असे अनेक पत्रकार, संपादक होऊन गेले आहेत की ज्यांनी फक्त चाकोरीबदध पत्रकारिताच केली नाही.तर प्रत्येक घटनेवर आपली परखड मतं सुद्धा व्यक्त केलीत.
असाच एक किस्सा आज आम्ही सांगणार आहोत. तो किस्सा आहे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या कधीकाळी दिल्ली प्रतिनिधी असणाऱ्या एका पत्रकाराचा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार कै.अशोक जैन यांचा. हा किस्सा आहे राजीव गांधी यांचा. राजीव गांधी लोकसभेत ज्या बाकावर बसत त्याच्या अगदी समोर पत्रकार कक्षात अशोक जैन यांची नेहमी बसण्याची जागा होती. त्यामुळे आपसूकच जैन आणि राजीव गांधी यांची तोंडओळख होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना जैनांना त्यांच्यासोबत मॉरिशस दौरा करण्याची संधी मिळाली होती.
या दौऱ्यात मॉरीशस मध्ये स्वागत कार्यक्रम प्रसंगी राजीव गांधी यांनी फक्त पाच मिनिटे बोलून आपले भाषण संपवायला पाहिजे होते. पण राजीव गांधी तब्बल अर्धा तास बोलले. त्यानंतर जेव्हा मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ बोलायला उभे राहिले तोच राजीव गांधीच्या लक्षात आले की आपल्या भाषणाचे एक पान वाचायचे राहिले आहे. तेव्हा “थांबा माझं एक पान भाषण वाचायचं राहिले आहे” असे सांगण्याचा बालिशपणा राजीव गांधी यांनी केला. त्यामुळे तिकडच्या राजकारण्यांच्या, पत्रकारांच्या नजरेत गांधींची वेगळी प्रतिमा तयार झाली. हे जैनांच्या चाणाक्ष नजरेने टिपले.
हा दौरा आटोपून जेव्हा परत यायच्या वेळी विमानात राजीव गांधींनी जैनांना विचारले की “कसा वाटला माझा परफॉर्मन्स” त्यावर अशोक जैन तडक उत्तरले. “तुमचा सगळाच परफॉर्मन्स म्हणजे एकदम डल परफॉर्मन्स” होता. आता जैनांच्या या कडकं शब्दात बोलण्याचा राजीव गांधींना राग आला. पण गांधींनी ते मनाला लावून ना घेता आपली चूक कबूल केली.
( सदर किस्सा अशोक जैन यांच्या “राजधानीतून” या पुस्तकातून घेतलाय.)