हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक झाली आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांची याआधी चौकशीही करण्यात आली होती. बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्याना मदत करणाऱ्या रॅकेटचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत रिपब्लिकनसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.
“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती.
टीआरपी म्हणजे काय?
टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.