हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी ही भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक काळापासून निवासी डॉक्टर आपल्या काही मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत, परंतु सरकार त्यांना फक्त आश्वासने देताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी थेट सरकारच्या विरोधात निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे.
नुकतेच राज्यव्यापी संपाविषयी अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याचा मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र राज्य सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आली. त्यामुळेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर संपाची भूमिका घेतील. या संपामुळे होणाऱ्या रुग्णसेवेवरील परिणामासाठी साठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील”
निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
1) निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
2) निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
3) निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे वेतन केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.