हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणाच्या तरी शिक्षणाला हातभार लागत आहे, याचा आनंद व त्या आनंदाला सत्काराची जोड असा द्विगुणित जल्लोष साजरा करणारा स्नेहमेळावा हेल्पिंग हँड्स सेव्ह अँड लर्न या संस्थेकडून नटराज मंदिर सातारा येथे आयोजित करण्यात आला. “शैक्षणिक -आर्थिक मदत एकूण 17 गरजू विद्यार्थ्याना देण्यात आली. तसेच संस्थेचे नियोजन समिती सदस्य, त्यांची प्रेरणा असणारे त्यांचे पालक ,संस्थेला जोडले गेलेले सदस्य व संस्थेशी जोडले गेलेले यशस्वी विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेला ज्यांनी विशेष सहकार्य केले आहे अशा सर्व व्यक्तींचे आभार मानले गेले तसेच त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार म्हणजे जेमतेम आर्थिक परिस्थितीत देखील इतरांना काहीतरी देण्याची भावना प्रकट करणारा स्नेहभरीत सोहळा होता.
संस्थेच्या कामाची ओळख केवळ सातारा जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता राज्यात दुर्गम भागात देखील काम करता यावे व खऱ्या अर्थी गरजू व्यक्तींपर्यंत पोहचता यावे यासाठी संस्थेच्या कार्य-पुस्तिकेचे प्रकाशन पालकांच्या हस्ते केले गेले. विद्यार्थीदशेत बचतीची सवय लागावी व त्यातून कोणाची तरी मदत करता यावी असे मनोगत पालकांपैकी कुसुम घोरपडे यांनी व्यक्त केले. आपली परिस्थिती नसताना देखील आपण इतरांना मदत करत आहोत ही भावना मोठी आहे असे मत नियोजन समिती सदस्य उत्कर्ष जाधव यांनी मांडले. शिवानी पवार व सोनाली निकम यांनी संस्थेच्या कार्याला उद्देशून संस्थेचे आभार मानले. कृतज्ञता निधी म्हणून देखील निधी जमा करता येईल व त्या मदतीतून हातभार लागण्यास मदत होईल असे शुभांगी दळवी यांनी सांगितले.
सदस्यांपैकी अमोल कांबळे, तनुजा मोरे व विनायक सपकाळ यांनी संस्थेविषयी प्रांजळ मत प्रकट केले. अर्जुन कोंढावळे व संपदा चव्हाण यांनी संस्थेला शुभेच्छा देत ‘विश्वास’ जो संस्थेचा पाया आहे तो गरजेचा आहे व सामाजिक कामासोबत व्यक्तिमत्वाचा विकास करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. मदत घेतल्यापैकी नेहा मांढरे यांनी संस्थेचे आभार मानून योग्य ठिकाणी वापर करण्याची ग्वाही दिली. विशेष सहकार्य पैकी लाल बहादूर शास्त्री कॉलेजचे उपप्राचार्य मा.अशोक तवर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी खानविलकर, प्रा. शेलार सर व अर्पिता भिलारे यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्षा शुभांगी दळवी मॅडमनी केले. विविध उपक्रमाविषयी माहिती श्रेया विंचूरे व अंकिता जंगम यांनी दिली तर आभार संस्थेचे सचिव मधुर भोसले यांनी मांडले.