सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यांतील बफर कोअर झोन व इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये समाविष्ठ असलेल्या हातगेघर मुर्हा येथील अनधिकृत समुह बंगल्याचे बांधकाम मुंबईच्या बिर्ला ग्रुप कम्पनी व धनदांडग्यांनी सुरुच ठेवले आहे. या ठिकाणी इमल्यावर इमले उभारुन देखील सातारा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. हातगेघर मुर्हा येथे राजेरोसपणे सुरु असलेल्या २० ते २२ समुह बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाला महसुल विभागाचाच वरदहस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महसुल विभागाकडुन सर्वसामान्य नागरिकांना इमारत बांधकामाकरिता बंधनकारक अटी आणि ग्रीन झोनचा बागुलबुवा दाखवुन परवानगी नाकारली जाते. तर त्याच बांधकामासाठी मुंबई आणि पुणे येथील धनदांडग्यांना पैशाच्या जोरावर अनधिकृत बांधकाम करु दिले जाते.
वन आणि बांधकाम विभागाच्या या दुटप्पीपणावर स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जावलीतील हातगगेघर मुर्हा येथे मुंबईच्या बिर्ला ग्रुप आॅफ कम्पनीने महसुल विभागाचे अधिकारी मॅनेज करुन इमारत रेखांकनाचा गफला करत चटई क्षेत्राच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत समुह बंगल्याचे नियमबाह्य इमले उभे केले आहेत. महसुल विभागाला बिर्ला ग्रुप आॅफ कंपनीच्या अनधिकृत बांधकामात मलिदा मिळाल्याने हातगेघर मुर्हा येथील अनधिकृत बांधकामावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातगेघर मुर्हा येथील गट नबंर १०९२ व १०९३ मध्ये समुह बंगल्याचे अनधिकृत बांधकाम झाले आहे. स्थानिक तलाठ्याकडुन नोटीशीची बिदागी देवुन झाली आहे. कागदोपत्री दिलेल्या नोटीसांचा संग्रह करुन फक्त कारवाईचा फार्स महसुल विभागाकडुन निर्माण केला गेला आहे.
धनदांडग्या बिल्डरकडून नियमबाह्य बांधकाम व परवानगीमध्ये गफला, बांधकाम रेखांकनापेक्षा नियमबाह्य बांधकाम अशा बऱ्याच भानगडी हातगेघर मुर्हा येथील समुह बांधकामात दिसून येत आहेत. हातगेघर मुर्हाच्या अनाधिकृत बांधकामाचा संपूर्ण लेखाजोखा महसुल विभागाकडे अधोरेखीत आहे.
मात्र महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना मलिदा मिळाल्याने फक्त नोटीसा बजावत आजपर्यंत कोणतीच कारवाई पुढे गेली नाही. हातगेघर मुर्हा येथील अनधिकृत बांधकामे व वाढत्या काँक्रीटच्या जंगलामुळे वन आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. महसुल विभाग मात्र प्रत्यक्षात चोराला गाठोडे उचलायला मदत करत असल्याचंच चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. हातगेघर मुर्हा येथील अनाधिकृत बाधकाम राजेरोसपणे सुरु आहे. येथील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.