केंद्रीय पथकाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ः पथकातील सदस्याला कोरोनाची लागण

ग्रामीण भागासह जिल्ह्यातील परिस्थितीची घेतली माहिती

औरंगाबाद | वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक रात्री उशिरा शहरात दाखल झाले. त्यानंतर सकाळी १०.४५ च्या सुमारास पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या केंद्रीय पथकातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने केवळ एकच सदस्य बैठकीला उपस्थित होते.

शहरासह ग्रामीण भागातील संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय पथकाची मदत आवश्यक आहे. मात्र आता उर्वरित एका सदस्यावरच मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, यात शंका नाही. राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती भयावह होत असल्याने केंद्राची तीस पथके आज राज्यात दाखल झाली आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे या शहरांसह औरंगाबादेतही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात संसर्गाची स्थिती गंभीर होत असल्याची दखल केंद्र सरकारने घेतली.

त्यानुसार आता संसर्गग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक दाखल झाले आहे. या प्रत्येक पथकात दोन तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. मोठ्या शहरात वाढणारा संसर्ग, उपचार व्यवस्था आणि उपलब्ध संसाधने याची माहिती हे पथक केंद्र सरकारला सादर करणार आहे. शहरात दररोज दीड हजारांवर रुग्ण सापडत आहेत. आरोग्य यंत्रणाही आता अपुरी पडते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मनपा अधिकाऱ्यांचे पथक व अधिकारी सकाळी साडेनऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १० च्या सुमारास या अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. आजच्या बैठकीला केंद्रीय पथकातील केवळ एकाच सदस्याची उपस्थिती होती. शहरात संसर्गाची स्थिती भयावह असताना आता केंद्रीय पथकातील सदस्यालाच संसर्गाची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like