Jhund Movie Review | भेदभावाच्या भिंतीला धडक देणारी जिगरबाज ‘झुंड’

Jhund Review
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड सिनेमा आज रिलीज झाला. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी आधीच चित्रपटाची भरभरून स्तुती केली असल्याने चित्रपटात नेमकं काय असणार याची उत्सुकता रसिक प्रेक्षकांना होतीच. या सर्व अपेक्षांवर खरा उतरलेला चित्रपट असंच ‘झुंड’ च्या बाबतीत म्हणता येईल. जात वास्तव दाखवून त्यावर विचार करायला भाग पाडणाऱ्या फँड्री, सैराट या चित्रपटांइतकीच ‘झुंड’ची कथा प्रभावी असून ‘वस्ती’ किंवा ‘झोपडपट्टी’ आणि तिथले लोक ही थीम न सोडता पूर्ण चित्रपट करण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाले आहेत.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/639918740406603

‘स्लम सॉकर’ म्हणजेच वस्तीतील फुटबॉल खेळणारी मुलं ही चित्रपटाची कल्पना टीजर आणि ट्रेलरमधून आधीच स्पष्ट झाली होती. वस्तीपातळीवरच्या लोकांचं रोजचं जगणं, त्यातील तानेबाने, भांडणं-मारामारी, व्यसनाधीनता, इतर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची नजर या घटना चित्रपटात अत्यंत समर्पकपणे मांडल्या आहेत. वस्तीतल्या लोकांच्या या जगण्याकडे आपण पाहून न पाहिल्यासारखं करतो किंवा ही परिस्थिती सुधारणार नाहीच अशी धारणा घेऊन इथला मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग जगत असतो. या धारणेला छेद देणारा विजय बोराडे (अमिताभ बच्चन) सारखा एखादा शिक्षक समाजात असू शकतो, तो समाजात कृतिशील बदल घडवू शकतो हा संदेश पोचवण्यात ‘झुंड’ला यश आलं आहे. वस्तीतील गुंडगिरी, व्यसनं यामुळे वस्तीतल्या मुलांची होत असलेली हानी, मुलांचं कमी वयातच जीवनाबद्दलचं गांभीर्य कमी होणं या सगळ्यांचा बारकाईने विचार करणारा शिक्षक या चित्रपटात मध्यवर्ती आहे. वस्तीतल्या मुलांना सुधारण्यासाठीचे त्याचे प्रयत्न, त्या प्रयत्नात व्यवस्थेकडून येत असलेल्या अडचणींशी दोन हात करणं हे सगळंच पाहण्यासारखं आहे.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/687585308932148

नागपूर शहरात या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून दोन समाजघटकांना वेगळं करणारी ‘भिंत’ हा रेफरन्स चित्रपटात अधिक समर्पकपणे वापरण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातील इतर चौकटीही उल्लेखनीय आहेत. यामध्ये गोंदियाच्या तलाठी कार्यालयातील बिरसा मुंडा यांची फ्रेम, त्याच ठिकाणी असलेला डिजीटल इंडियाचा बोर्ड, कोर्टातील भिंतीवर असलेल्या गांधी आणि आंबेडकरांच्या प्रतिमा, बाबासाहेब जयंती साजरं करण्याचं स्वरूप, दुकानदाराकडून विद्यार्थ्यांच्या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात मदत मिळणं, विमानाने उड्डाण घेताना भिंत लांघनं या फ्रेम्सचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र दाखवण्याचा अट्टहास करणाऱ्या सरकारला आपल्या कलाकृतीतून सणसणीत चपराक लगावण्याचं काम नागराजने केलं आहे. ते कसं हे पाहण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचंच आहे.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/447494537110846

फँड्री आणि सैराट या मराठी चित्रपटात भूमिका केलेले बहुतांश कलाकार या चित्रपटात पुन्हा दिसतात. चित्रपटातील गाणी जोशपूर्ण आहेत. १-२ रॅप गाणीही प्रभावी आहेत. सुरुवातीला काहीसा संथ वाटणारा चित्रपट नंतर खेळाच्या निमित्ताने गुंतवून ठेवतो. त्या खेळातील बारकाव्यांसोबत व्यक्तीमधील बारीक-बारीक बदलांची भाषाही बोलतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात अमिताभने कोर्टात सादर केलेलं ६ मिनिटांचं मनोगत प्रभावी आहे. चित्रपटाचा सार म्हणावा असंच ते मनोगत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला काल्पनिक अशी पाटी असली तरीसुद्धा वस्ती अनुभवलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट रिलेट होणारा आहे. ‘भारत म्हणजे काय?’ या चित्रपटात एका चिमुकल्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरच ‘झुंड’ असं आहे. देशातील नागरिकांना या ‘झुंड’ची ओळख आणि ताकद दाखवून देणाऱ्या नागराज मंजुळे यांचं कौतुक करणं त्यासाठीच गरजेचं आहे.