‘लग्नाचं वय झालं नसेल तरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा तरुणांना अधिकार’, उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंढीगड । भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी विवाहाचा अधिकार प्राप्त होतो. मात्र, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लग्नाचं वय न गाठलेल्या, मात्र कायद्याने सज्ञान (18 वर्षांवरील) व्यक्तींना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सज्ञान जोडप्याला मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं मत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्या. अल्का सरीन यांच्या खंडपीठाने नमूद केलं.

“एखाद्या व्यक्तीने त्याचं किंवा तिचं आयुष्य कसं जगावं हे समाज ठरवू शकत नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हा जगण्याच्या अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकरणामध्ये तरुणी सज्ञान आहे. त्यामुळे तिने कोणासोबत आयुष्य घालवावं, हे ठरवण्याचा अधिकार तिच्या पालकांना नाही. पालकांना मुलांवर आपल्या अटी लादण्याचा अधिकार नाही. ‘एखाद्या तरुणाचं लग्नाचं वय झालं नसेल, पण तो जर कायद्याने सज्ञान असेल तर त्याला सज्ञान जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे. प्रौढ जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकार आहे. फक्त मुलाचे वय लग्नायोग्य नाही म्हणून तो अधिकार नाकारता येणार नाही” असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

एका जोडप्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी याचिका न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने फतेहगड साहिबच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना (एसएसपी) जोडप्याला सुरक्षा पुरवण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले.

या प्रकरणातील तरुणीचं वय 19 वर्ष, तर तरुणाचं वय 20 वर्ष आहे. दोघांनाही लग्न करायचं असल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं. पण तरुणीच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता, त्यावरुन तिला अनेकदा मारहाणही करण्यात आली होती. दोघांचं नातं समजल्यानंतर तरुणीला तिच्या घरच्यांनी कोंडून ठेवलं होतं. पण 20 डिसेंबर रोजी तिने घरातून पळ काढला आणि प्रियकरासोबत राहायला लागली. तरुणीला तिचा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार असून स्वतःसाठी काय चांगलं आहे आणि काय नाही हे ठरवण्यास तरुणी सक्षम आहे, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment