Wednesday, June 7, 2023

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता रस्ते अपघातातील नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागणार नाही

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातानंतर मिळणाऱ्या भरपाईबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. रस्ते अपघातानंतरच्या सर्व प्रक्रियेसाठी मंत्रालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे जी संबंधित एजन्सीला त्याच कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हा नवा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नुकसान भरपाईसाठी न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणाऱ्या पीडित कुटुंबांना फायदा होणार आहे. यासोबतच आता वाहनाच्या इन्शुरन्समध्ये वाहन मालकाचा मोबाईल नंबरही अनिवार्य करण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार नुकसान भरपाईची सर्व प्रक्रिया 120 दिवसांत पूर्ण करावी. यामध्ये अपघाताचा सविस्तर रिपोर्ट 90 दिवसांत तयार करावा लागणार आहे. यानंतर, इन्शुरन्स कंपनीला आपली प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करावी लागेल. अशाप्रकारे ही प्रक्रिया 120 दिवसांत पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या DM ने रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. अपघातानंतर 48 तासांच्या आत पोलिसांना FAR म्हणजेच फर्स्‍ट एक्‍सीडेंट रिपोर्ट लिहावी लागेल.

या संदर्भात एक्सपर्ट अँड सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या करुणा रैना यांनी सांगितले की,”आता हिट अँड रनच्या बाबतीत होणाऱ्या मृत्यूवर सरकारने निश्चित केलेली जास्तीत जास्त 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींसाठी 50,000 रुपयांची भरपाई न्यायालयात न जाताही निकाली काढता येईल. या भरपाईसाठी उत्पन्नाचा कोणताही पुरावा लागणार नाही. सरकारने ठरवून दिलेली भरपाई घेतल्यानंतरही पीडित न्यायालयात जाऊ शकतो.”

बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (CMVR) चे अध्यक्ष गुरमीत सिंग तनेजा म्हणाले की,”सरकारच्या या निर्णयामुळे पीडितांना मोठा फायदा होईल. यामुळे नुकसान भरपाई मिळवण्यात मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल. याशिवाय मोबाईल नंबर इन्शुरन्सशी लिंक केल्यास वाहन मालकाचा शोध घेणेही सोपे होणार आहे. लोकं वारंवार मोबाईल नंबर बदलत नाहीत.

भरपाईच्या रकमेत हा बदल
रस्ते वाहतूक मंत्रालयाने हिट अँड रन प्रकरणात भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे. आता गंभीर जखमी व्यक्तीला 12500 ते 50000 रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय, हिट अँड रनमुळे मृत्यू झाल्यास, 25000 ते 200000 लाख रुपयांपर्यंत पेमेंट केले जाऊ शकते.