सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता. अखेर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एकूण सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून तीन धारदार कोयते, वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल आणि रोख रक्कम ३४ हजार ७०० असा एकूण १ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी सांगली – सोलापूर आंतरजिल्हा कार्यरत होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली.
सांगली शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि ट्रक हि वाहने अडवून चालकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच किमती ऐवज लुटल्याच्या घटना वारंवार घडल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच ट्रक चालकांना लुटल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक अंकली येथे पेट्रोलिंग साठी गेले असता त्यांना माहिती मिळाली कि जुन्या रेल्वे गेट जवळ सहा ते सात अनोळखी तरुण संशयित रित्या कोल्हापूर-सांगली रोड वरील पेट्रोल पंपाजवळ राज्यातील व राज्य राज्याबाहेरून येणाऱ्या ट्रक चालकांना लुटण्याच्या उद्देशाने थांबले आहेत. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून छापा टाकला असता हे तरुण दरोड्याच्या तयारीत असताना सापडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ तीन धारदार कोयते, लोखंडी सळी, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल्स आणि रोख रक्कम ३४ हजार ७०० रुपये असा एकूण मुद्देमाल १ लाख २७ हजार ७०० रुपये मिळून आला. त्यांच्याकडे पथकातील कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्यांनी अंकली फाटा, धामणी रोड, सांगली-मिरज रोड, वांटमूरे कॉर्नर या ठिकाणी लुटमारी केल्याची कबुली दिली. त्यांना अधिक तपासासाठी अटक करण्यात आली आहे.
शाहरुख नदाफ, सोहेल उर्फ टोल्या तांबोळी, नागेश जगदाळे, राज्या उर्फ राजू कोळी, संतोष उर्फ ऋतिक चक्रनारायण, अजय उर्फ वासुदेव सोनवणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यातील शाहरुख नदाफ आणि अजय सोनवणे हे सध्या सोलापूर जिल्ह्यात राहण्यास होते. अटक केलेल्यांमध्ये सर्वजण १८ ते २० वर्षे वयोगटातील तरुण आहेत. त्यांच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे सर्व जण पोलिसांना चकवा देण्यासाठी मोटारसायकलची चोरी करून त्या चोरी केलेल्या गाडीवरून लूटमार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ट्रक चालकांना लुटमारीच्या घटनेचा तपास करणे हे पोलिसांना मोठे आव्हान होते. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.