जालन्यामध्ये चोरटयांनी शेकडो लिटर डिझेलची केली चोरी

जालना : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी सार्वजानिक वाहनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भीडले असताना जालन्यात काही चोरट्यांनी थेट पेट्रोल पंपावरून तब्बल 400 लिटर डिझेलची चोरी केली. या चोरटयांनी प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्री पेट्रोल पंपावर डल्ला मारला आहे. हि चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या पेट्रेल पंपावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. हि चोरीची घटना औरंगाबाद- बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील AL भगवान पेट्रोल पंपावर घडली आहे. या आरोपींनी 26 जानेवारीच्या दिवशी मध्यरात्री या पेट्रोल पंप परिसरात 400 लिटर डिझेलची चोरी केली. सगळ्यात अगोदर चोरट्यांनी पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पेट्रोल चोरी करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी मोटर लावून 400 लिटर डिझेलची चोरी केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पेट्रोल पंपाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.