हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा, रोहितदादा, पार्थदादा, जयदादा आणि आता युगेंद्रदादा… बारामतीच्या पवार कुटुंबात एका मागून एक येणाऱ्या दादांची ही लाईन वाढत चाललीये… यातले जय आणि पार्थ अजित पवार गटातील…. तर रोहित आणि युगेंद्र हे शरद पवार गटातील… बारामतीच्या राजकारणात आधी कसं सगळं सोर्टेड होतं… दिल्लीच्या राजकारणात ताईंनी लक्ष घालायचं तर राज्याचं सगळं राजकारण दादा बघणार…पण याच सगळ्यात राष्ट्रवादीत दोन गट पडतात काय…आणि एकामागून एक पवार कुटुंबातील नवे चेहरे राजकारणात उडी घेतात काय.. पवार कुटुंबातच नव्या दमाचे 5 ते 6 दादा सध्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्यामुळे येणाऱ्या काळात बारामतीचा दादा कोण बनतोय? शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबाचा वारसा नक्की कोणत्या दादाकडे शिफ्ट होऊ शकतो? नव्याने राजकारणाच्या रिंगणात आलेल्या या दादांचे प्लस मायनस काय आहेत? आणि या सगळ्याचा पवार कुटुंबावर कसा इम्पेक्ट पडू शकतो? त्याचाच हा रिपोर्ट…
बारामतीच्या या पवार कुटुंबातील पहिला दादा आहे तो रोहितदादा…
शरद पवारांच्या राजकारणाकडे बघत पॉलिटिक्समध्ये उतरलेले दादा म्हणजे रोहितदादा..रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू…रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतला शिरसूफळ हा होता… मात्र, दोन वर्षांनी आलेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी मोठी रिस्क घेतली… आणि आमदारकीसाठी मतदारसंघ निवडला तो दुष्काळी कर्जत जामखेडचा…इथले विद्यमान खासदार आणि तेव्हाचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित दादा जायंट किलर ठरले… आणि मोठ्या दिमाखात खासदार झाले…प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची ‘किलर इंस्टिंक्ट’ रोहित पवारांनी यावेळेस दाखवली होती…शरद पवारांनी आपलं नेतृत्त्वं महाराष्ट्रभर आणि विविध क्षेत्रात पसरवलं, तसंच रोहित पवार करतायेत. मग त्यासाठी राज्यभरात फिरणं असो, पत्रकारांशी मैत्री करणं असो, कलाकारांना भेटणं असो, इत्यादी गोष्टी ते करतात. राजकारणाच्या पलिकडच्या क्षेत्रातही स्वत:ला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केलीय…
शिक्षण आणि रोजगार संबंधीचे प्रश्न असोत की एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी पहिल्याच टर्ममध्ये स्वतःला स्टेट लेवलचा नेता बनवण्यासाठी विविध टॅक्टीक वापरल्या… आणि आता त्यात त्यांना यश येताना दिसतंय…अजित पवार हे पक्ष फुटीनंतर दुसऱ्या गोटात गेल्यावर आपलं नेतृत्व सिद्ध करायला रोहितदादांना आणखीनच स्कोप मिळाला… अजित पवार, छगन भुजबळ ते प्रफुल्ल पटेल यांसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांना ते खडे बोल सुनावू लागले… शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं वजन वाढलं…लोकसभेच्या प्रचारात त्यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रचारामुळे आणि तब्बल 8 जागा जिंकल्यामुळे येणाऱ्या काळात रोहित दादांना मोठे फ्युचर आहे… 2050 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न रोहित दादा बाळगून आहेत अशी चर्चा असते… त्यामुळे हा पक्षातील फाटाफुटीचा सगळा खेळ रोहित दादांच्या पथ्यावर पडलाय असं म्हणायला हरकत नाही…
बारामतीच्या राजकारणातील दुसरा दादा आहे तो पार्थदादा…
अजितदादांचे पुत्र पार्थदादा यांच्या राजकारणाची सुरुवातच पराभवापासून झाली…मागचा पुढचा कुठलाही राजकीय अनुभव नसताना पार्थ पवार यांना मावळमधून 2019 चं लोकसभेचं तिकीट देण्यात आलं… अजितदादांनी संपूर्ण ताकत लावूनही पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला…पवार कुटुंबातील हा पहिलाच पराभव असल्याने या धक्क्यातून कुणीही लवकर सावरू शकला नाही… अजित दादा पार्थ पवारांकडे आपला राजकीय वारस म्हणून पाहतात…मात्र त्यांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगचा प्रयोगच फसल्याने अजितदादांवर बरीच ठिकाही झाली… एकदा खासदारकीला पडल्यावर मात्र राजकारणात फारसे काही दिसले नाहीत.. नाही म्हणायला महाविकास आघाडीच सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, म्हणून लिहिलेल्या पत्रामुळे ते एकदा फोकसमध्ये आले होते…
त्यावर पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत… असं म्हणून स्वतः शरद पवारांनीच आपल्या नातवाला निकालात काढलं होतं…यानंतर राम मंदिरापासून अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बराच गोंधळ उडाला होता…पवार कुटुंबात विरोध होता.. पण तो सोशल मीडियावरून जग जाहीर करायला पार्थ पवार यांनी सुरुवात केली आणि तेव्हाच पवार कुटुंबात कुठेतरी विस्तव आहे? याची जाणीव व्हायला सुरुवात झाली…नंतर अजित दादांनी जेव्हा पक्ष फोडला… तेव्हा पार्थ पवार पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये आले… प्रचार सभांना आणि विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी सुरू झाल्या…त्यांना सरकारकडून वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली…बारामतीतून आपल्या आईला निवडून आणण्यासाठी पार्थ पवार फ्रंटला आले होते… मात्र हे सगळं करूनही निकाल उलटा लागला… आणि सुप्रियाताई निवडून आल्या…मात्र असं असलं तरी येणाऱ्या विधानसभेत अजित पवार पार्थ दादांसाठी काही नवा विचार करू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे…
बारामतीच्या राजकारणतील तिसरा दादा अर्थात युगेंद्रदादा…
तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी फुटल्यावर बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा पवार कुटुंबातील सामन्याची घोषणा झाली तेव्हा युगेंद्र पवार हे नाव सर्वात पहिल्यांदा मीडियासमोर आलं… शरद पवारांची भेट घेऊन ते राजकारणात ऍक्टिव्ह झाले…बारामती लोकसभा मतदारसंघाची सुप्रिया ताईंच्या प्रचाराची सगळी धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती… घोंगडी बैठकांपासून गाव दौऱ्यापर्यंत बारामती आणि परिसरात त्यांनी चांगला कनेक्ट वाढवला…अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव…युगेंद्र पवार हे स्वभावानं अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी आहेत…शरयू ऍग्रोचे सीईओ, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही असल्याने वय लहान असलं तरी त्यांचा लोकांच्यातील कनेक्ट हा सुरुवातीपासूनच राहिलाय…बारामती मतदारसंघात त्यांनी केलेल्या वादळी प्रचारामुळेच अजितदादांवर प्रचाराच्या सांगता सभेतून युगेंद्र पवारांवर टीका करण्याची वेळ आली…
पण आपल्याला टारगेट केलं जातं असलं तरी त्यांनी संयम कायम ठेवला… त्यांनी केलेल्या मोर्चे बांधणीचं यश म्हणून की काय सुप्रियाताई निवडून आल्या . अर्थात या सगळ्यामागे युगेंद्र पवार यांचा एक राजकीय पर्पज आहे तो म्हणजे बारामती विधानसभेचा…बारामती विधानसभेला अजित दादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आमदारकीच्या मैदानात उतरेल असा सध्या एकही तगडा उमेदवार नाही…अशा वेळेस बारामतीची विधानसभा युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी होईल, अशी चर्चा आता पुऱ्या पंचक्रोशीत होऊ लागलीय…युगेंद्र पवार यांनी विधानसभेसाठी आपल्या प्रचाराचा नारळही फोडलाय…बारामती विधानसभेत अजितदादांना हरवून जायंट किलर ठरायचंच असा जणू त्यांनी चंग बांधलाय…त्यामुळे बाकी दादा जाऊंद्या पण जर युगेंद्र पवार यांनी ठरवलं ते केलं तर यामुळे डायरेक्ट अजितदादांच्या राजकारणाला नख लागू शकतं… त्यामुळे पवार कुटुंबातील राजकारणात हातपाय मारणाऱ्या या दादांपैकी येत्या काळात कोण कुणाला वरचढ ठरेल? हे आत्ताच सांगता येणं तसं जरा जास्त अवघड आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचा पुढचा दादा कोण असेल? रोहित, युगेंद्र की पार्थ… तुम्हाला काय वाटतं? तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.