शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही..नातू रोहितने सांगितल्या कार्यकर्त्याच्या भावना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही,’ अशा शब्दात एका कार्यकत्याने व्यक्त केलेल्या भावना पवारांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरवरून शेअर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल कार्यकर्त्यांनी अनेक मार्गानी भावना व्यक्त केल्या.

अनेक कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याने रोहित पवार यांच्या व्हॉट्सअपवर पवार साहेबांच्या प्रति भावना व्यक्त केल्या. त्या रोहित पवार यांनी ट्विटद्वारे पवार साहेबापर्यंत पोचविल्या आहेत. त्या पोस्टमध्ये पवारांविषयी कार्यकर्ता म्हणतोय कि, “या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर.. संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे,”

अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं रोहित पवारांनी शेअर केलं आहे. “हे पाय आहेत जमिनीवरचे… आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत, पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी, कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त जे कधीच आटणार नाही,” कार्यकर्त्यानं व्यक्त केलेल्या भावनानंतर पवार साहेब कार्यकर्त्यांसाठी किती जवळचे व महत्वाचे आहेत हे समजते.

You might also like