आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलगा रोहित पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. गुरुवारी पाटील यांच्या घरातील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. तसेच आमदार सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सांगली जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, माजी आमदार संभाजीराव पवार, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या घरातही करोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि मुलगा रोहित पाटील या दोघांचे अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाले. पॉझिटिव्ह अहवाल येताच दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. आमदार सुमनताई पाटील यांचीही स्वॅब तपासणी केली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रोहित पाटील हे बुधवारी तासगाव येथे झालेल्या कोविड उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते. रोहित पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालकमंत्र्यांसह कार्यक्रमातील इतरांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात करोना साथीचा संसर्ग वाढतच चालला आहे. इस्लामपूरमध्ये आधीच जनता कर्फ्यू लावण्यात आला असताना पाठोपाठ जिल्ह्यातील पलूस नगरपरिषदेनेही पाच दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like