सांगली : कवठेमहांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही अशा शब्दात रोहित आर आर पाटील यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले.
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, १९ तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ता ज्यांच्याहाती १५ वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडविण्यासाठी एकत्र आलो आहे असे म्हणत आहेत. आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय पाहिजे हे सांगतो. जे लोक संडासच्या बाथरूम मध्ये पैसे खातात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते.
तसेच, मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहित आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत त्यांनी माझ्या पुढे येऊन सांगावं. बघूया कोण काय सांगत किती विकास झालाय आणि किती विकास व्हायचा राहिलाय. असे प्रतिआव्हान रोहित आर आर पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले.