हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा फिरकीपटू पियुष चावलाने (Piyush Chawla) कर्णधार रोहित शर्माबद्दलची (Rohit Sharma) एक सिक्रेट गोष्ट उघड केली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये भारताकडून शेवटचा खेळलेल्या चावलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहितसोबत ड्रेसिंग रूमही शेअर केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये पियुष चावला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. रोहित शर्मा हा फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाच्या बाहेर सुद्धा संघाचं कसा विचार करतो ते सांगताना पियुष चावलाने रोहित शर्माबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. समोरच्या फलंदाजाला आऊट करण्यासाठी रोहितने एकदा रात्री २:३० वाजताच गेम प्लॅन सांगितल्याचे चावलाने सांगितलं.
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना पियुष चावला म्हणाला, रोहित शर्मासोबत मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे कि आमच्यातील नातं घट्ट झालं आहे. मैदानाबाहेरही आमच्यात बोलणं होत असते. एकदा तर रात्री २:३० वाजता रोहितने मला मेसेज करून विचारलं कि जागे आहात का? त्यानंतर त्याने मला रूम मध्ये बोलावलं आणि एका कागदावर फिल्ड पोझिशन लिहिली आणि डेव्हिड वॉर्नरला कसं बाद करायचं याबाबत गेम प्लॅन सांगितला. म्हणजेच रात्रीच्या वेळीही माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी होईल याचा विचार रोहित करत असल्याचे पियुष चावलाने सांगितलं.
यावेळी पियुष चावलाने रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केलं आहे. पियुष चावला म्हणाला, एक असतो कर्णधार आणि एक असतो लीडर…. रोहित हा फक्त कर्णधारच नव्हे तर लीडर सुद्धा आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आणि 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहितने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि अशा प्रकारे आपला इन्टेन्ट सेट केला त्यामुळे बाकी फलंदाजांना बॅटिंग करणे सोप्प झालं. खरा लीडर तोच आहे जो तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देतो असं म्हणत पियुष चावलाने रोहित शर्मावर कौतुकांचा वर्षाव केला.
दरम्यान, पियुष चावलाने भारताचा ऑल टाईम बेस्ट XI संघ सुद्धा निवडला. पियुष चावलाने आपल्या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह, झहीर खान. या खेळाडूंना स्थान दिले आहे.