हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आक्रमक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा आणि नकोसा विक्रम झाला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर झाला आहे. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहित 16 व्यांदा शून्यावर माघारी परतला.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियम सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केलं. आजच्या सामन्यात रोहित शर्मा सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर आला. सलामीला आलेला कॅमेरून ग्रीन दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर आलेला रोहित सुद्धा फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. दीपक चहरच्या गोलंदाजीवर अवघ्या तिसऱ्याच चेंडूवर रवींद्र जडेजाकडे झेल देऊ रोहित तंबूत परतला. रोहितच्या आयपीएल कारकिर्दीतील हा 16 वा भोपळा आहे. रोहित नंतर मनदीप सिंग, सुनील नारायण, दिनेश कार्तिक हे फलंदाज आत्तापर्यन्त 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
दरम्यान, 5 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स कामगिरी यंदा म्हणावी तशी झालेली नाही. आत्तापर्यत खेळलेल्या 9 सामन्यात मुंबईने 5 विजय आणि 4 पराभव पाहिले आहेत. मुंबईचा संघ पॉइंट टेबल मध्ये 6 व्या क्रमांकावर आहे. सुमार गोलंदाजी आणि रोहित शर्माचा खराब फॉर्म ही मुंबईची मुख्य समस्या राहिली आहे. तरीही प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी मुंबई इंडियन्स आपला सर्वोत्तम खेळ दाखवावाच लागेल.