हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी वनडे रँकिंग मध्ये (ICC One Day Ranking) मोठी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करत रोहितने हा कारनामा केला आहे. आता रोहितच्या पुढे फक्त पाकिस्तानचा बाबर आझम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा सध्या ३७ वर्षाचा आहे, या वयात सुद्धा त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखत युवा खेळाडूंसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतोय.
श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत जिथे विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ फिरकीपुढे चाचपडत होता अशा पिचवर रोहितने (Rohit Sharma) धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 धावा केल्या. यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत रोहितने ३५ धावांची खेळी केली. यात सुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने तब्बल 141.44 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या होत्या. भलेही भारताने श्रीलंकेविरुद्धची सिरीज हारली असेल मात्र रोहितला त्याच्या देदीप्यमान कामगिरीचा आयसीसी रँकींगमध्ये मोठा फायदा झाला आणि शुभमन गिलला मागे टाकत तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोचला. ताज्या क्रमवारीनुसार शुबमन गिलचे ७६३ गुण आहेत तर रोहित शर्माचे ७६५ रेटिंग गुण आहेत. तर बाबर आझम 824 रेटिंग गुणांसह अग्रस्थानी आहे.
रोहितचा दमदार फॉर्म कायम – Rohit Sharma
रोहित शर्माचे वय जस जस वाढत आहे तस तस त्याचा खेळ आणखी उंचावत आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापासून रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. समोर जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू असो, आपल्या खास शैलीत रोहित समोरच्या गोलंदाजांचे वाभाडे काढत असतो. आत्ताही रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच एकमेव फलंदाज आहे जो फुल्ल फॉर्मात आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 265 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 257 डावांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने 10866 धावा केल्या आहेत. या कालावधीत हिटमॅनने 31 शतके आणि 57 अर्धशतके केली आहेत. त्याने तब्बल ३ वेळा एकाच डावात २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितची सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे.