हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा भाग व्हावंच लागेल असे फर्मान बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) काढल्यानंतर, मुंबईचा राजा, हिटमॅन रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल. आपला लाडका रोहित पुन्हा एकदा मैदानावर दिसणार असल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. परंतु दुसरीकडे विराट कोहलीची उपलब्धता अजूनही संशयास्पद आहे. तोविजय हजारे ट्रॉफी खेळेल कि नाही हे अजून स्पष्ट नाही.
कधीपासून सुरु होणार विजय हजारे ट्रॉफी ? Rohit Sharma
विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारत ३ ते ९ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळेल आणि त्यानंतर ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळेल. विजय हजारे ट्रॉफी शिवाय रोहित शर्मा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत सुद्धा खेळेल असं बोललं जात आहे. तो मुंबईतील शरद पवार इनडोअर अकादमीमध्ये सराव करत आहे.
खरं तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटला रामराम ठोकला आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसतात. नुकतंच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही चांगली कामगिरी केली होती. रोहितने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले, तर कोहलीने दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ असलेले विराट आणि रोहित आगामी २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळावे अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.
बीसीसीआयचे फर्मान –
विराट आणि रोहितसाठी बीसीसीआयने मोठी अट ठेवल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. जर भारताच्या या दोन्ही अनमोल रत्नांना संघात राहायचे असेल तर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. जर ते देशांतर्गत क्रिकेट खेळले तरच त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळेल अशी अट बीसीसीआयने घातल्याचे समजते.




