‘नाथाभाऊ तुम्ही आरपीआयमध्ये या! आपण सरकार आणू!’ रामदास आठवलेंची एकनाथ खडसेंना ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना आरपीआयमध्ये प्रवेशाची ऑफर दिली आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे, आपण आपले सरकार आणूया असे आवाहन आठवले यांनी खडसेंना केले आहे. येत्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सह्याद्री गेस्ट हाऊस वर आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. त्यांना जायचं असतं तर आधी जायला हवं होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. पण मंत्रिमंडळ आता फुल्ल झालं आहे. त्यापेक्षा त्यांनी आरपीआयमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा देण्याचं काम आम्ही करु. त्यांना सत्तेत यायचं असेल तर त्यांनी आताचं सरकार घालवले पाहिजे, असं आठवले म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं, असं आवाहन केलं होतं. त्यावेळी आठवलेंना कोणीही गांभीर्याने घेत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. यावरही आठवलेंनी भाष्य केलं. “मला गांभीर्यानं घेणारे अनेक लोक आहेत. माझं ऐकणारा समाजात मोठा वर्ग आहे. ज्यांना माझं बोलणं पटत नसेल त्यांना मला गांभीर्यानं घ्यायचं नसेल. त्यावर माझा नाईलाज आहे. मला जे वाटतं, जे पटतं ते मी बोलत राहणार.”

दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर गर्दी करु नका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात 6 डिसेंबर रोजी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा लोकांनी चैत्यभूमीवर येऊ नये, गर्दी करु नये असे आवाहन आम्ही करत आहोत. चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment