राज्यातील कारागृहांमध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा; राजू शेट्टींचा खळबळजनक खुलासा

0
3
raju shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील कारागृहांमध्ये 2023 ते 2025 या कालावधीत सुमारे 500 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या घोटाळ्यात राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कैद्यांच्या गरजांवर होणारा गैरव्यवहार

राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या देखभालीसाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. यामध्ये अन्नधान्य, कडधान्ये, दूध, फळे, भाजीपाला, मांस, अंडी, बेकरी पदार्थ यांसारख्या वस्तूंची खरेदी होते. ही खरेदी केंद्रशासित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येते. मात्र, या प्रक्रियेत सायास गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.

शासनाच्या इतर विभागांमध्ये ज्या दराने साहित्य खरेदी होते, त्याच वस्तू कारागृह विभागाने अव्वाच्या सव्वा किमतीत खरेदी केल्या. त्यात ११ रुपये ते ३० रुपये प्रति किलो अधिक दराने धान्य व साखर, तर ११० रुपये ते २५० रुपये अधिक दराने डाळी, चहा पावडर आदींची खरेदी झाली आहे. याशिवाय, वॉशिंग मशीन, जनरेटर, ड्रोन कॅमेरे, प्रिंटर आणि कुलर यांसारख्या वस्तू देखील बाजारभावाच्या दुप्पट-तिप्पट दराने खरेदी केल्याचे समोर आले आहे.

निकृष्ट अन्न व भेसळयुक्त पदार्थ

राजू शेट्टी यांनी सांगितले की, कारागृहांमध्ये कैद्यांना दिले जाणारे अन्न हे अत्यंत खालच्या दराचे आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ आढळून आली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीमध्ये कैद्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या फराळाच्या वस्तू स्थानिक बाजारातील अतिशय हलक्या प्रतीच्या होत्या. काही कारागृहांमध्ये अन्न व भेसळ विभागाने छापे टाकून नमुने तपासले, मात्र त्यानंतरही कोणतीही सुधारणा झाली नाही.

कैद्यांना निकृष्ट अन्न देणे हीच शिक्षा

पत्रकारांशी बोलताना येरवडा कारागृहात काही काळ कैदी म्हणून राहिलेल्या राजू शेट्टी यांनी स्वतःच्या अनुभवातूनही परिस्थिती उलगडून सांगितली. ते म्हणाले की, “कैद्यांना जेवण म्हणून दिला जाणारा चहा पाणचट असतो. चपात्या कच्च्या असतात, भात न शिजवता दिला जातो, भाज्यांमध्ये चव नसते आणि बेकरी पदार्थ बुरशीयुक्त असतात. मी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी उत्तर दिले की, कैद्यांना जर चांगले अन्न दिले तर तुरुंगात राहण्यासाठी गर्दी होईल. याचा अर्थ निकृष्ट अन्न देणे हेच कैद्यांसाठी शिक्षेचा एक भाग मानला जातो.”

दरम्यान, कारागृह खरेदी घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांचा देखील हात आहे. हे अधिकारी व ठेकेदार संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे. या विरोधात तक्रारी असूनही राज्य सरकार व प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत आहे. आता हे अधिकारी “आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही” अशी वृत्ती ठेवून कैद्यांचा छळ करत आहेत.

महत्वाचे म्हणजे, या घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच, कारागृह खरेदीतील अपव्यय व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.