हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करून वाहतूक निरीक्षकांनी चालकाला पकडलं. यावेळी त्याला तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांचा दंड बजावला.
महाबळेश्वर येथे आरटीओ पथकाकडून वाहनांच्या कागदपत्रांच्या तपासणीची मोहीम राबविली जात आहे. इराणी पेट्रोल पंपाजवळ राबविल्या जात असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीच्या मोहिमेवेळी अजमुद्दीन वलगे यांनी आरटीओ पथकास पाहिले. यावेळी त्याने आपली कार (क्रमांक MH11 BD 8282) हि कार सुमारे शंभरहून अधिक वेगावे पळवली. त्याचा संशय आल्याने वाहतूक निरीक्षकांनी देखील त्याचा पाठलाग केला. कार पळवण्याच्या नादात चालकाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. या धरपकडीवेळी भरधाव वेगात असलेल्या कारने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने वेग कमी झाला. अखेर पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षकांनी चालकाला पकडले.
याप्रकरणी कारचालक अजमुद्दीन वलगे याला 1 लाख 90 हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी केली.
आरटीओ पथक येताच वाहनांची लपवा-छपवी
आरटीओ पथक दर महिन्याला शहर व तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागद पत्रांची तपासणी करत असते. यावेळी पथकाकडून वाहन कर, वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन पासिंग अशी दर महिन्याला कागदपत्रे तपासणी केली जाते. तालुक्यात काळी पिवळी ट्रॅक्सी व टुरिस्ट टॅक्सी जवळपास 800 वाहने आहेत. यात कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही. त्यामुळे शहरात आरटीओचे पथक आल्याचे कळताच वाहनचालक, मालक वाहने लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.