औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने लग्न सोहळ्यासाठी 25 जणांची उपस्थिती व दोन तासाचा वेळ मर्यादेची तरतूद केली आहे. मात्र पैठण चे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या लग्नात हे नियम धुडकावून देण्यात आले ही बाब कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत लग्नाचे आयोजक वधूपिता गणेश भारत चौधरी व चितेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्स चे मालक प्रल्हाद कडुबा बागडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच बागडे यांना 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.
4 मे रोजी चितेपींपळगावातील बागडे पाटील लॉन्स मध्ये दुपारी चौधरी यांच्या मुलीशी पैठण चे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नसमारंभात 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती, ही माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना मिळाली.
पाटील यांनी तातडीने पथकासह मंगल कार्यालयकडे धाव घेतली, पोलीस लग्नस्थळी पोहोचेपर्यंत बरीच गर्दी ओसरली होती, मात्र तरीही कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे पोलिसांना दिसून आले, त्यामुळे त्यांनी चितेगाव ग्रामपंचायतीच्या कोरोना नियंत्रण समितीचे सदस्य पांडुरंग सर्जेराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.व बागडे यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावून नोटीस बजावली. कारवाई नंतर पंचक्रोशीत या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगत होती.