केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये, अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले आहे. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे कामही मलिक यांनी केले. यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली आहे.

रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे. राज्य सरकारने पुढील 48 तासांत मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. माझ्या एका तक्रारीने कोर्टात केस उभी राहिली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीरवरून केंद्रावर गंभीर आरोप केला होता. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं होतं. राज्यसरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असून हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.

You might also like