नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रशिया-युक्रेन संकटाचे परिणाम वेगवेगळ्या देशात दिसू लागले आहेत. या युद्धाचा परिणाम सर्वसामन्यांवर होत असून तुमच्या खिश्यावर ताण येणार आहे. या युद्धामुळे खाद्य तेल आणि पेट्रोल डिझेल मध्ये दरवाढ होत असतानाच आता येत्या काळात बिस्किटे देखील महाग होऊ शकतील.
आता बिस्किटे कशी महागणार असा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल. वास्तविक, यामागे गव्हाची भाव वाढ हे मुख्य कारण आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गव्हाचे दर वाढले आहेत. याचाच परिणाम कंपन्या आणि ग्राहक दोघांवरही होणार आहे.
एका बिस्किटात 60 टक्के गव्हाचे पीठ, 20 टक्के खाद्यतेल आणि 20 टक्के साखर असते. आणि जर आपण खर्चाबद्दल विचार केला तर त्यात 30 टक्के गहू, 15 टक्के तेल, 10 टक्के साखर, 10 टक्के पॅकेजिंग आणि 35 टक्के इतर खर्चाचा समावेश होतो.
रशिया हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार देश आहे
रशिया हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार आहे तर युक्रेन हा जगातील तिसरा सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार आहे. या दोन्ही देशांमधील युद्धामुळे इतर गोष्टींसह गव्हाच्या पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय आला आहे. पुरवठा साखळीतील अडचणींमुळे गव्हाचे भाव वाढले आहेत. यंदा गव्हाचे भाव सुमारे 111 टक्क्यांनी महागले आहेत.
गव्हाशिवाय पामतेलाच्या किंमती एका वर्षात जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. पुरवठा साखळीतील अडचणींमुळे साखरेच्या दरातही 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर पॅकेजिंग आणि इतर खर्चही वाढले आहेत. पार्ले, ब्रिटानिया यांसारख्या बिस्किट कंपन्यांनी यंदा 6 ते 8 टक्क्यांनी भाव वाढवले आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यानंतरही बिस्किटांच्या किंमती 5, 10 आणि 15 रुपयांवर कायम आहेत. वास्तविक, कंपन्यांनी बिस्किटांचा आकार कमी केला आहे. मात्र, यानंतरही बिस्कीट कंपन्यांना कमाई मिळवता आलेली नाही.