हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी 3- 4 नावं आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचं नाव नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून फडणवीसांवर (Saamana Editorial on Devendra Fadnavis) जोरदार हल्लाबोल केला आहे. नसती उठाठेव करण्यापेक्षा आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी घ्या असा सल्ला सामनातून फडणवीस यांना देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे असेही ठाकरे गटाने म्हंटल आहे.
सामना अग्रलेखात काय म्हंटल?
महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्ध ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मुळात त्यांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस-मिंधे व अजित पवार यांच्यातच खेचाखेची सुरू आहे. फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच मिंधे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वताला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या- जाणाऱ्यांना “शुक Is | शुकIs” करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तरहा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे.
फडणवीस हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्याची उठाठेव करतात, पण स्वताच्या महायुती वगैरेबाबत मात्र ते सांगतात की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.’ यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे फडणवीसांना किंचितही वाटले होते काय? पण ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून व जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले. आपल्या साधेपणाने त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले असेही सामनातून म्हंटल आहे.
आपल्याला मुख्यमंत्री व्हायचेच नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, मी त्यास पाठिंबा देतो, असा खुला आवाज ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांसमोर दिला. कारण बिनचेहऱ्याने निवडणुकांना सामोरे जाणे अडचणीचे ठरेल. शरद पवार, नाना पटोले वगैरे नेत्यांनी आपापल्या पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव संमतीने पुढे करावे, शिवसेना त्यास पाठिंबा देईल. असे विधान करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे हे कौतुकास पात्र आहेत. महाविकास आघाडीचा चेहरा कोण? यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी निकाल दिला आहे. महाराष्ट्राचे जनमानस वेगळे व नेत्यांच्या मनात वेगळे असे होणार नाही. सगळेच पक्ष रोज सर्वेक्षणे वगैरे करून निर्णय घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचा कौल त्यांच्यापर्यंत पोहोचलाच असेल.
काँग्रेस पक्षात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे नामवंत चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख असे महत्त्वाचे चेहरे आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन यापैकी एका चेहऱ्यास पसंती द्यायची व शिवसेनेने त्याचे समर्थन करायचे असा खुला हिशेब उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावरही फडणवीस हे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील अशी ‘बासुंदी’ उधळत आहेत. मात्र त्यामुळे त्यांचे गणित कच्चे आहे व त्यांना निराशेने ग्रासले आहे हेच स्पष्ट होते. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे! असं म्हणत सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.